बीआरटी समितीचे कामही धीम्या गतीने; पाच महिन्यांत केवळ तीन बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:08 AM2018-07-27T04:08:14+5:302018-07-27T04:08:40+5:30

शहरातील बहुतेक बीआरटी मार्ग अपूर्णावस्थेत

BRT committee work slow; Only three meetings in five months | बीआरटी समितीचे कामही धीम्या गतीने; पाच महिन्यांत केवळ तीन बैठका

बीआरटी समितीचे कामही धीम्या गतीने; पाच महिन्यांत केवळ तीन बैठका

पुणे : शहरातील विविध बीआरटी मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीआरटी देखभाल-दुरूस्ती समितीचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. शहरातील बहुतेक बीआरटी मार्ग अपूर्णावस्थेत असून मागील काही वर्षांपासून केवळ डागडुजी केली जात आहे. त्यात सुधारणासाठी नेमण्यात आलेली समितीच या वाटेने जात असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील स्वारगेट-कात्रज हा पहिला पथदर्शी बीआरटी मार्ग अनेक वर्षांनंतरही बाल्यावस्थेतच आहे. सध्या या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. शहरातील नगर रस्ता, संगमवाडी रस्ता, सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गही अर्धवट आहेत.
काही मार्गांची दुरवस्था झाली असून प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीची स्थापना करून
पाच महिने उलटले आहेत. बीआरटी मार्गांची पाहणी करून त्यातील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्याची जबाबदारी या समितीवर आहे. पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पथविभातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पीएमपीतील काही अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीची स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच नगर रस्त्यावरील बीआरटीची पाहणी केली. तर आतापर्यंत पाच महिन्यांत तीन बैठका झाल्या आहेत. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. समितीने केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याचा मुद्दा समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. सूचनांचा गांभीर्याने विचार न करता केवळ डागडुजी करून कामे पुढे ढकलली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
प्रशासन बीआरटी समितीबाबत उदासीन असून अशी बुजगावणे बनलेली समितीच नको, अशा शब्दांत समितीचे सदस्य आणि पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी नाराजी व्यक्त केली.

बैठकीला पालिका आयुक्तही हवेत
बीआरटी मार्गांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याची गरज आहे. या अहवालामध्ये प्रत्येक मार्गावर असलेल्या त्रुटी व त्यावरील उपाययोजना, त्याचा कालावधी याचा समावेश असायला हवा. तसेच पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत समितीची बैठक व्हायला हवी. सूचनांचा विचारच होत नसेल तर समितीचा काहीही उपयोग होणार नाही.
- जुगल राठी, समितीचे सदस्य

Web Title: BRT committee work slow; Only three meetings in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.