माहितीपुस्तिकांचा भुर्दंड
By Admin | Updated: June 4, 2015 05:28 IST2015-06-04T05:28:58+5:302015-06-04T05:28:58+5:30
बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्याचे पालक प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशासाठी धडपड आहेत. शहर तसेच, पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालयातून इच्छुक

माहितीपुस्तिकांचा भुर्दंड
पिंपरी : बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्याचे पालक प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशासाठी धडपड आहेत. शहर तसेच, पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालयातून इच्छुक शाखेचा अर्ज घेत आहेत. अर्जासाठी माहितीपुस्तक माथी मारले जात असून, त्याची किंमत दोनशे ते १ हजार रुपये अशी आहे. प्रवेश घ्या अगर घेऊ नका मात्र, माहितीपुस्तकाची सक्ती असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. मात्र, काही महाविद्यालयातर्फे मोफत माहितीपुस्तकाचे वाटप होते.
मार्च महिन्यात झालेल्या बारावीचा निकाल २७ मे रोजी आॅनलाईन जाहीर झाला. तेव्हापासूनच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील वरिष्ठ महाविद्यालयानी प्रवेश अर्ज विक्रीस सुरुवात केली आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू आहे. इच्छुक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी फिरत आहेत. अर्ज आणि माहितीपुस्तिका शुल्क आकारणी केली जात आहे. एका माहितीपुस्तकांची किंमत दोनशे ते १ हजार रुपयांपर्यत आहे. पुस्तकात अर्ज जोडलेला असतो. तोच महत्वाचा असतो.
यामध्ये प्रथम वर्गाचे सक्तीचे विषय तसेच, वैकल्पिक विषय, माध्यम, विविध प्रकाराचे शुल्क,वसतीगृह आदीची माहिती असते. केवळ दोन ते तीन पाने विद्यार्थ्यांला उपयुक्त असतात. इतर २० ते ३० पानांमध्ये त्या शैक्षणिक संस्थेची तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती असते. यामुळे हे आकर्षित आकारातील माहितीपुस्तक केवळ शोभेचे ठरते. मात्र, त्याचा भुर्दड विद्यार्थी व पालकांना पडतो. महाविद्यालयात प्रवेश घेणे निश्चित नसले तरी, माहितीपुस्तक खरेदी करावे लागते. पर्याय म्हणून प्रत्येक विद्यार्थी साधारणता ३ ते ४ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाचा अर्ज भरावा लागतो. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी रकम भरुन अर्ज विकत घ्यावा लागतो. काही महाविद्यालयात आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया असूनही माहितीपुस्तक घ्यावेच लागते. यामुळे साधारणता हजार ते दोन हजार रुपये या माहितीपुस्तकावर खर्ची होतात. प्रवेश निश्चित होताच, महाविद्यालयात वेगवेगळे भरमसाठ शुल्क भरुन प्रवेश घ्यावा लागतो.(प्रतिनिधी)