राणी लक्ष्मीबाई पूल : भोर शहरातील ब्रिटिशकालीन पूल तीन वर्षांपासून धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 12:09 AM2019-02-06T00:09:01+5:302019-02-06T00:09:45+5:30
भोर शहरातील नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन सुमारे ८६ वर्षांपूर्वीच्या धोकादायक राणी लक्ष्मीबाई पुलाचे तीन वर्षे होऊनही अद्याप सोशल आॅडिटचा रिपोर्ट आला नसतानाही मागील तीन वर्षांपासून धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे.
भोर : भोर शहरातील नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन सुमारे ८६ वर्षांपूर्वीच्या धोकादायक राणी लक्ष्मीबाई पुलाचे तीन वर्षे होऊनही अद्याप सोशल आॅडिटचा रिपोर्ट आला नसतानाही मागील तीन वर्षांपासून धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे.
तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पुराच्या पाण्यात कोकणातील सावित्री नदीवरील बिटिशकालीन पुल वाहून गेल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले होते आणि संपूर्ण राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरची वाहतूक तत्काळ बंद करून सदर सर्वच पुलांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भोर शहरातील नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरची वाहतूक काही महिने बंद होती; मात्र कोणताही आॅडिट रिपोर्ट येण्याआधीच पुन्हा वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे पुलावरील वाहतुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भोर-पुणे मार्गावरील नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन राणी लक्ष्मीबाई पुलाला ८६ वर्षे झाली असून पूल जीर्ण झाला आहे. सदर पुलाच्या मचव्यावर पिंपळ, वड व इतर झाडे उगवली आहेत. यामुळे पुलाचे मचवे खराब होऊन तो धोकादायक बनला आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून पुलाची डागडुजी केली नाही, तर धोका निर्माण होऊ शकतो.
भोर एसटी स्थानकात आणि भोर-पुणे रस्त्यावर भोर शहर व भोलावडे गावाला जोडणारा नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पूल श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव ऊर्फ बाबासाहेब पंडित अधिपती भोर संस्थान यांनी आपल्या द्वितीय पत्नी श्रीमंत राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ सदर पुलाला राणी लक्ष्मीबाई ब्रिज असे नाव देण्यात आले आहे. पुलाचे काम १७ फेब्रुवारी १८९१ रोजी सुरू झाले आणि १७ मे १९३३ रोजी पूर्ण झाले. त्या वेळी सुमारे एक लाख ४० हजार रुपये खर्च झाला होता. व्ही. आर. रानडे अँड सन्स यांनी पुलाचे काम केले होते. त्याला सुमारे ८६ वर्षे झाली आहेत.
नीरा-देवघर धरणातून येणारे पाणी याच पुलाखालून जात असते. शिवाय, बाराही महिने पुलाला पाण्याचा प्रवाह सहन करावा लागत असतो. या पुलाला ८६ वर्षे झाली असून पुलाच्या क्षमतेचा आणि ब्रिटिश एजन्सीच्या इशाऱ्याचा विचार करता, हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याची गंभीर दखल घेतली नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पुलाची डागडुजी करण्याची गरज असून सदर पूल धोकादायक आहे किंवा नाही, याचा कोणताही आॅडिट रिपोर्ट आला नसतानाही पुन्हा पुलावरून वाहतूक सुरू केली आहे.
चौकट - राणी लक्ष्मीबाई पुलावर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने २००१मध्ये या पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला. मात्र, त्या वेळी ब्रिटिशकालीन पूल भविष्यात नादुरुस्त होईल, याचा विचार न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन अरुंद पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे सदर पुलावरून दुहेरी वाहतूक करणे अडचणीचे ठरत असून त्यामुळे नवीन पुलावर वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही.
भोर शहरातील सदरच्या ब्रिटिशकालीन पुलाशिवाय रामबाग येथील ओढ्यावरील, वेनवडी येथील महांगीर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पूल तर आंबेघर, निगुडघर येथील नीरा नदीवरील पूल धोकादायक आहेत की नाही, याचीही महिती बांधकाम विभागाकडे नाही.
प्रवाशांचा जीव धोक्यात, दुर्घटनेची शक्यता
या ब्रिटिशकालीन पुलाच्या दगडी बांधकामात पिंपळ, वडाच्या झाडांचे साम्राज्य पसरले असून झाडांची मुळे दगडांमध्ये खोलवर रुजल्याने दगडी बांधकामाला भेगा पडत असून दगडी मचवे खराब होत आहेत. पिंपळाच्या झाडांनी पिलरला विळखा घातला आहे.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, सदर ब्रिटिशकालीन पुलाच्या शेजारीच समांतर २००१मध्ये पर्यायी पूल बांधण्यात आला आहे.
सदरचा पूलही अरुंद असल्याने दोन्ही पुलांवरून एकेरी वाहतूक सुरू आहे. याशिवाय शाळा-कॉलेजचे विद्यार्थी ये-जा करीत असतात. कोकणात जाणारे पर्यटक मांढरदेवीला जाणारे भाविक याच मार्गाचा वापर करीत असल्याने मोठ्या प्रमाणात पुलावरून वाहतूक सुरू असते.