तीन हजार रुपये आणा; नाहीतर दंड..!
By Admin | Updated: February 23, 2015 00:48 IST2015-02-23T00:48:28+5:302015-02-23T00:48:28+5:30
कोणत्याही मार्गावर गेला तरी दररोज ३ हजार रुपये आगारात जमा करण्याचे अजब टार्गेट पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पुणे स्टेशन आगाराने

तीन हजार रुपये आणा; नाहीतर दंड..!
पुणे : कोणत्याही मार्गावर गेला तरी दररोज ३ हजार रुपये आगारात जमा करण्याचे अजब टार्गेट पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पुणे स्टेशन आगाराने वाहकांना दिले आहे. हे टार्गेट न गाठल्यास त्यांना ५० ते २०० रुपयांपर्यंत दंडही केला जात आहे. याबाबत काही वाहकांनी नाराजी व्यक्त केली असून, असे टार्गेट चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
मागील दोन महिन्यांपासून पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त बस मार्गांवर आणण्याबरोबरच प्रवाशांची संख्या वाढविण्यावरही भर दिला जात आहे.
त्याअनुषंगाने पीएमपीच्या दहा
आगारांचे मूल्यांकनही केले जात आहे. त्यामुळे आगारप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारीही वाढली आहे. यातूनच उत्पन्नवाढीच्या वेगवेगळ््या कल्पना आणल्या जात आहेत. पुणे स्टेशन आगाराने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक वाहकाला दररोज ३ हजार रुपये रक्कम जमा करण्याचे टार्गेट दिले आहे. विशेष म्हणजे सर्व मार्गांसाठी हे टार्गेट सारखेच आहे. तसेच त्यातून रविवार किंवा इतर सार्वजनिक सुट्याही वगळण्यात आलेल्या नाहीत.
पीएमपी कामगार संघाचे (इंटक) उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी वाहकांना अशा प्रकारे दंड ठोठावण्याचा प्रकार चुकीचे असल्याचे म्हटले आहे.