पुणे : वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे असलेल्या जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी बाणेर सज्जा कार्यालयातील तलाठ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह एकाला विभागाने ताब्यात घेतले आहे.
तलाठी उमेश विठ्ठल देवघडे (वय ३९, बाणेर सज्जा कार्यालय, वर्ग-३) आणि काळुराम ज्ञानदेव मारणे (वय ३९, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे असलेली जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी त्यांच्या पत्नीने आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज तलाठी कार्यालयात सादर केला होता. त्याचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते. तक्रारदार हे चौकशीसाठी बाणेर तलाठी कार्यालयात अर्जाच्या चौकशीसाठी गेले असता तलाठी उमेश देवघडे यांनी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तलाठी उमेश देवघडे यांच्या सांगण्यावरून काळुराम मारणे याने तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली असल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आरोपी देवघडे यांच्या कारमध्ये ३ लाख रुपयांची रक्कम मिळाली. दोघांविरुद्ध बाणेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विभागाच्या पोलिस अधीक्षक नीता मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.