बिनधास्त ढोसा अड्ड्यावर दारू
By Admin | Updated: February 22, 2015 01:02 IST2015-02-22T01:02:50+5:302015-02-22T01:02:50+5:30
पिंपरी पोलीस ठाण्यापासून काही पावलांच्या अंतरावर राजरोसपणे तळीरामांचा अड्डा सुरू असतोे. एखाद्या गल्लीबोळात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या तळीरामांच्या अड्ड्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होऊ शकते.

बिनधास्त ढोसा अड्ड्यावर दारू
संजय माने ल्ल पिंपरी
पिंपरी पोलीस ठाण्यापासून काही पावलांच्या अंतरावर राजरोसपणे तळीरामांचा अड्डा सुरू असतोे. एखाद्या गल्लीबोळात छुप्या
पद्धतीने सुरू असलेल्या तळीरामांच्या अड्ड्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु, पुणे- मुंबई महामार्गालगत वर्दळीच्या ठिकाणी चिंचवड स्टेशन येथे पाल ठोकून चायनीज स्टॉलच्या नावाखाली सुरू असलेला अड्डा पोलिसांना दिसून येत नाही, याचे सर्वांना आश्चर्य वाटते. पोलिसांच्या अशा डोळेझाक वृत्तीमुळे चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, भोसरी उड्डाणपूल, निगडी, कुदळवाडी रस्ता, पूर्णानगर असे शहरभर तळीरामांचे अड्डे भरभराटीस आले आहेत.
चिंचवड, वेळ सायंकाळी ६ ची...अंधार पडू लागताच मद्यपींची पावले पुणे-मुंबई महामार्गालगतच्या चिंचवड स्टेशन येथील अड्ड्याकडे वळू लागलेली. जसा जसा अंधार होत गेला, तशी गर्दीही वाढत होती. जवळच असलेल्या दारूच्या दुकानातून दारूची बाटली, बिअरची बाटली घेऊन लगेच भर रस्त्यावरील त्या चायनीज स्टॉलमध्ये शिरणारे अनेक जण दिसून आले.
चकना म्हणून त्या चायनीज स्टॉलवर काही तरी घेऊन येणाऱ्या मद्यपींची संख्या मोठी होती. अहिंसा चौकात सिग्नलला वाहने थांबताच तेथील गोंधळ, झिंगलेली माणसे, एकमेकांशी अर्वाच्च भाषेत बोलणारे मद्यपी हे चित्र सहज कोणाच्याही नजरेस येत होते. थोडे अंतर पुढे गेले, तर पिंपरी पोलीस ठाणे आहे. पण, पोलिसांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, की जाणीवपूर्वक डोळेझाक होते, हे कोणाच्याही लक्षात यायला वेळ लागत नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सहज दिसते, ते पोलिसांना का दिसत नाही? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत होते. ज्यांच्याकडे कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांनी अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्याकडे डोळेझाक केली, तर सांगणार कोणाला? अशी हतबलताही नागरिक व्यक्त करीत होते.
आपण हे सामाजिक भावनेतून करत आहोत, अशा पद्धतीने ते याचे समर्थन करू लागले आहेत. नागरिकांचे संसार उद्ध्वस्त करणारे मद्यविक्रेते तळीरामांचे बेकायदा अड्डे उभारून सामाजिक भावनेतून हे उद्योग करीत असल्याचे सांगतात. निदान, पोलिसांनी तरी कर्तव्याची जाण दाखवली, तरी परिस्थितीत बदल घडून येईल, अशी भाबडी आशा नागरिकांना आहे.
विक्री करणारे, चायनीज स्टॉलवाले यांचे साटेलोटे, तर पोलिसांचा वरदहस्त अशा संगनमताने चिंचवड स्टेशन येथील भर चौकात हा प्रकार सुरू आहे. चायनीज स्टॉलमुळे मद्यविक्रीच्या
व्यवसायास बळकटी येते, तर मद्यविक्रीचे दुकान जवळच असल्याने चायनीज स्टॉलवाल्याला आयते ग्राहक मिळतात. असे साटेलोटे असून, त्यास पोलिसांचे अभय मिळत असल्याने तळीरामांचा हा अड्डा आता येथे कायमचा झाला आहे. गरिबांना बारमध्ये बसून दारू पिणे परवडत नाही.
त्यामुळे बिचारे या ठिकाणी येऊन दारू पितात. त्यांची ही गरज लक्षात घेऊन अशी सुविधा
उपलब्ध करून दिल्याचे मद्यविक्रीशी संबंधित व्यावसायिक सांगतात.
दुकानाचे झाले गोदाम, हॉटेल बनले दुकान
थरमॅक्स चौकातील संभाजीनगर रस्त्यावर एका इमारतीच्या तळमजल्यात मद्यविक्रीचे दुकान आहे. लगेच शेजारी छोटेखानी हॉटेल आहे. हॉटेल छोटे असले, तरी ग्राहकांची वर्दळ मोठी आहे. परिणामी, हॉटेलचालकाचा गल्लाही रोज चांगलाच भरतो. मद्यविक्रीचे दुकान नावाला आहे, दुकान म्हणताच येणार नाही, गोदामच ते; कारण त्या ठिकाणी दारूची, बिअरची बाटली घेऊन लगेच शेजारच्या हॉटेलात प्रवेश केला जातो. दुकानाच्या काउंटरवरून बाटली उचलायची एवढेच, उर्वरित सर्व काही सुविधा त्या हॉटेलात सहज उपलब्ध आहेत. बिअरबारचे परमिट घेतलेल्या हॉटेलपेक्षा जादा कमाई करणारे हे छोटे हॉटेल आहे. हॉटेल व्यावसायिक चकण्यासाठी हवे ते पदार्थ लगेच तळून देतो.
घरकुलजवळ हातभट्टीचा अड्डा
घरकुल प्रकल्पाजवळ मोकळ्या जागेत हातभट्टी, दारूविक्रीचे प्लॅस्टिक तंबू पाहावयास मिळतात. या तंबूत दिवसभर मद्यपींची वर्दळ असते. बांधकामांवर काम करणारे मजूर, तसेच मिळेल त्या ठिकाणी रोजगार करणारे कामगार यांच्यासाठी हा तंबू उपयुक्त ठरू लागला आहे. मद्यपींच्या वर्दळीमुळे या भागात वादंग, शिवीगाळ, हाणामारी असे प्रकार घडू लागले आहेत. उघड्यावर थाटलेल्या या हातभट्टीच्या दुकानाकडे पोलिसांचे लक्ष जात नाही. तसेच, नव्याने साकारण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पाजवळ असा हातभट्टीचा अड्डा असल्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. कोणीही या विषयी तक्रारसुद्धा करीत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने राजरोसपणे हा अड्डा सुरू आहे.
४मंगळवारी या हॉटेलजवळ फेरफटका मारला. वेळ सायकांळी साडेपाचची. तळमजल्यातील हॉटेलची ख्याती ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, असे मद्यपी येऊ लागलेले. मद्यविक्रीच्या दुकानाजवळ गर्दी नव्हती. गर्दी होती, हॉटेलमध्ये. ज्याची त्याने दुकानातून बाटली आणायची, हॉटेलचालक प्लॅस्टिक ग्लास देणार, असा सर्व प्रकार सुरू होता. कंपन्यांमध्ये हेल्परचे, तसेच बांधकाम व्यावसायिकांकडे मजुरी करणारे कामगार मद्यपी म्हणून आल्याचे निदर्शनास येत होते. कोणी शिव्या देत होते, तर कोणी मोठ्या आवाजात ओरडत होते. झिंगलेल्या अवस्थेतील एकाला हॉटेलमालक मारहाण करीत होता. कानाखाली आवाज काढत होता. मार खाणारा तो तरुण गुमान सर्व काही सहन करीत होता. नशेत असल्याने मार पडताच, तोसुद्धा हॉटेलचालकावर गुरगुरत होता. हे सर्व सुरूच असताना, मद्यपी मात्र हॉटेलातच हॉटेलात एकापाठोपाठ एक पेग रिचवत होते. रात्री या ठिकाणी काय होत असेल, याची कल्पना या परिस्थितीवरून लक्षात येत होती. या ठिकाणी जवळपास पोलीस चौकी, ठाणे नाही. त्यामुळे तर सर्व काही अलेबेल असेच आहे. हप्ते नेण्यासाठी येणारे पोलीस आहेत, कारवाईसाठी येणारे नाहीत. त्यामुळेच या हॉटेलवाल्याने खुले आम तळीरामांचा अड्डा सुरू ठेवला आहे, असे नागरिक सहज बोलतात.