पुणे :गणेशखिंड रोडवर ब्रेकफेल झालेल्य पीएमपी बसने पुढून जाणाऱ्या एसटीबसला मागून धडक दिल्याने हाहाकार माजला होता. पुलावर मध्येच बस थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही बस पूर्णपणे खिळखिळी झाल्याने क्रेन लावूनही उचलणे शक्य नव्हते. क्रेनचालकांनी जीवावर उदार होऊन ती रस्त्यावरून बाजुला केला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. एसटी बसला धडक दिल्यानंतर पीएमपी बसचालक ब्रेकफेल झाल्याचे सांगत गाडी बाजूला घेण्यास तयार नव्हता़ शेवटी पोलिसांनी एका क्रेनचालकाला बोलावले़ क्रेनने बस बाजूला करायला सुरुवात केली़ बसला ‘टो’ करण्यासाठी पुढे असलेल्या लोखंडी बारला त्याने लोखंडी दोरखंड लावला . केवळ एका नळबोल्टवर असलेले हे लोखंडी बार निखळून बाहेर आले़ या खिळखिळ्या बसला रस्त्याच्या बाजुला करणे एक आव्हान होते. उतारावरून बस उचलताना क्रेनवरच आदळण्याची भीती होती. मात्र, शेवटी क्रेनचालकाने आतल्या लोखंडी आडव्या बारला दोरखंड लावला़ चालकाने बसचा ब्रेक लावतच ती पुलावरून खाली आणली. पुण्यातील पीएमपी बसची अवस्थाच या घटनेने पुढे आली. ही बस बाजूला करत असतानाच संचेती पुलाच्या सुरुवातीला आणखी एका बसच्या रेडिएटरमधील पाणी संपल्याने तीही रस्त्यावर उभी होती. याच रस्त्यावर तिसरी बसही बंद पडली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत विद्यापीठाकडून सिमला आॅफिसकडे येणारी वाहने अगदी मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती़ (प्रतिनिधी)
ब्रेकफेल पीएमपीने उडविला हाहाकार
By admin | Updated: May 6, 2016 05:54 IST