उजनी जलाशयात वाळूसम्राटांवर धाडसी कारवाई
By Admin | Updated: October 9, 2016 04:25 IST2016-10-09T04:25:21+5:302016-10-09T04:25:21+5:30
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७)मध्यरात्रीपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील

उजनी जलाशयात वाळूसम्राटांवर धाडसी कारवाई
इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७)मध्यरात्रीपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शहा गावातील अवैध वाळूउपश्यावर एकोणीस तासांची धडक कारवाई केली. १४ फायबर व यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. वाळूचे मोठे सात साठे जेसीबीने नदीपात्रात लोटले.
या कारवाईच्या निमित्ताने बोटींचे सुमारे ७० लाख रुपयांचे, त्यामधील दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ८४ ब्रास वाळूचे आणि सात वाळूसाठ्यांचे असे मिळून वाळूमाफियांचे एक कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले. हे वाळू शोधून काढण्यासाठी वाळूउपसा करणाऱ्या पाच परप्रांतीय कामगारांनाच त्यांनी सोबत घेतले होते.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तरीदेखील इंदापूर तालुक्यातील शहा गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळूउपसा केला जातो, याची माहिती मिळाली होती. मध्यरात्रीच त्यांनी पोलीस अधिकारी, वनअधिकारी, तसेच पोलीस व महसूल पथकासह कारवाईसाठी वाळू उपशाच्या जागा हेरल्या. पहाटेपासून ते आज रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवण्यात आली.
शहा गावातील उजनी जलाशयात जवळपास ४ ते ५ किलोमीटर अंतर आतमध्ये जाऊन रात्रीच्या वेळी वाळूसम्राटांच्या वाळूउपशाच्या अड्ड्यांमध्ये घूसून कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली. या कारवाईत तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे, वनपाल पी. डी. चौधरी, सहायक फौजदार राजेंद्र पाटोळे, पोलीस कर्मचारी विजय झारगड, जी. एस. चौधर, प्रशांत राखुंडे, सुशांत तारळेकर, आमीर मुलाणी, वनविभागाचे कर्मचारी एच. जी. बागल, बाळू वाघमोडे, सुभाष काळेल, तुकाराम देवकर आदींनी या कारवाईत भाग घेतला. यापूर्वी बोटींचा स्फोट घडवून आणला जात होता. आता जलसमाधीच दिल्याने वाळूसम्राटांना हादरा बसला आहे. (वार्ताहर)
कारवाईमध्ये सातत्य
ठेवणार: श्रीकांत पाटील
यासंदर्भात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले, की वाळूसम्राटांनी परप्रांतीयांना बोटीवर चालक म्हणून घेतले आहे. त्यांनाच बरोबर घेऊन जवळपास १४ बोटी उजनी जलाशयाच्या पात्रात बुडवल्या. त्याचबरोबर त्यांनी उपसा केलेला वाळूसाठा नष्ट केला आहे. तसेच ७ वाळू साठ्यांमध्ये माती मिसळण्यात आली आहे. वाळूसम्राट रात्रीच्या वेळीच मोठ्या प्रमाणात वाळू उपसतात, त्यामुळे रात्रीच कारवाई केली. यापुढे यामध्ये सातत्य राहणार आहे.