जेधे चौक घेणार मोकळा श्वास
By Admin | Updated: May 23, 2016 02:14 IST2016-05-23T02:14:02+5:302016-05-23T02:14:02+5:30
जेधे चौकात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

जेधे चौक घेणार मोकळा श्वास
पुणे : जेधे चौकात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शंकरशेठ रस्ता
आणि सातारा रस्त्यावर पुलाच्या खाली उभारण्यात आलेले लोखंडी बांधकाम स्ट्रक्चर काढून घेण्यात आले असल्याने चौक मोकळा झाला आहे.
या शिवाय स्ट्रक्चर काढण्यात आल्यानंतर या चौकानेही मोकळा श्वास घेतला आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्यात
सातारा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना थेट शंकरशेठ रस्ता आणि सारसबागेकडे उड्डाणपूलावरून जाता येणार असल्याने या चौकात सातारा रस्त्यावरून येणारी जवळपास ४५ टक्के वाहतूक कमी होणार आहे.
महापालिकेच्या तब्बल १५७ कोटींच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून
हे काम करण्यात येत आहे.
दरम्यान, या उड्डाणपुलाचे उद्घाटन १५ मे रोजी करण्याची घोषणा महापौर प्रशांत
जगताप यांनी केली होती. मात्र, पुलाचे काम पूर्ण न झाल्याने ३१ मे रोजी उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यात सातारा रस्त्यावर स्वारगेट ते साईमंदिर या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वारगेटहून सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना लक्ष्मीनारायण चौकात लागणारा वेळ वाचत आहे.
सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनाही याचा मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सातारा रस्त्यावरून जेधे चौकातून सारसबागमार्गे मध्यवर्ती शहर तसेच कॅम्प तसेच हडपसरकडे जाणाऱ्या ‘वाय’ आकाराच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
हे काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले असून वाय आकाराच्या ठिकाणचा रस्ते जोडणीचे शेवटच्या टप्प्यातील काम शिल्लक आहे.
दुसऱ्या बाजूस उड्डाणपुलावरील पथदिवे, डांबरीकरण, वाहतूक नियमांचे फलक तसेच पुलाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेले आहे.तिसऱ्या टप्प्याचे
काम लवकरच
येत्या काही दिवसांत दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर एमएसआरडीसीकडून तातडीने तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने शंकरशेठ रस्त्याकडून सारसबागेकडे जाण्यासाठी दुचाकी, हलकी वाहने तसेच जड वाहनांसाठी भूयारी मार्ग (व्हेईकल अंडरपास) करण्यात येणार आहे. या शिवाय या परिसरात पीएमपीचे मुख्य बसस्थानक तसेच स्वारगेटचा एसटी आगार आणि लवकरच मेट्रो स्टेशन होणार असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षीत रस्ता ओलांडता यावा यासाठी दोन पादचारी भुयारी मार्गही तयार करणार आहेत.