तूरडाळीच्या भावाला ब्रेक

By Admin | Updated: October 25, 2015 03:41 IST2015-10-25T03:41:13+5:302015-10-25T03:41:13+5:30

डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी अन्नधान्य वितरण विभागाने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेमुळे भावाला लगाम बसला आहे. मागील पाच दिवसांत तुरडाळीचे भाव घाऊक

Break to Turdali's brother | तूरडाळीच्या भावाला ब्रेक

तूरडाळीच्या भावाला ब्रेक

पुणे : डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी अन्नधान्य वितरण विभागाने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेमुळे भावाला लगाम बसला आहे. मागील पाच दिवसांत तुरडाळीचे भाव घाऊक बाजारात प्रति क्विंटल तीन ते साडे तीन हजार रुपयांनी उतरले आहेत. तुलनेने इतर डाळींचे भाव मात्र फारसे कमी झालेले नाहीत. घाऊक बाजारात सध्या डाळींना फारसा उठाव नसल्याने हे भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुरडाळीसह अन्य डाळींची उच्चांकी भाववाढ झाल्यानंतर केंद्रासह राज्य सरकारने साठेबाजांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. डाळींची साठा मर्यादाही निश्चित केली. त्यानुसार सोमवारी रात्रीपासून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरूवातही केली. राज्य सरकारने साठेबाजांवर मोक्का लावण्याचे घोषित केले. या सर्व घडामोडींमुळे मागील पाच दिवसांत डाळींचे भाव उतरू लागले आहेत. पुढील आठवड्यात हे भाव आणखी खाली येतील, असा अंदाज आहे. सोमवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तुरडाळीचे भाव प्रति किलो २०० रुपयांच्या पुढे गेले होते. आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव ठरला. कारवाई सुरू झाल्यानंतर हळूहळू भाव कमी होवू लागला. शनिवारी हा भाव १४० ते १७० रुपयांपर्यंत खाली घसरला. घाऊक बाजारात भाव कमी होत असले तरी किरकोळ बाजारात मात्र फारशी घट झालेली नाही. दुकानदारांनी चढ्या भावाने डाळींची खेरदी केलेली असल्याने तो साठा संपेपर्यंत भाव कमी केले जाणार नाहीत, असे चित्र आहे. पुढील आठवड्यापासून किरकोळमधील भाव उतरतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
डाळींची भाववाढ झाल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे बाजारात डाळींची मागणी घटली आहे. परिणामी डाळीला नेहमीप्रमाणे उठाव नाही, असे डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी सांगितले. आता साठेबाजांवर कारवाई सुरू झाल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनी अधिक साठा करण्याचे टाळले आहे. तसेच भाव जास्त असल्याने डाळ खरेदी करण्याकडे त्यांनीही टाळाटाळ सुरू केली आहे.
वाढीव भावात डाळ खरेदी करून त्याची कमी किंमतीत विक्री करावी लागण्याच्या भीतीमुळे नवीन खरेदी जवळपास ठप्प झाली आहे. मागील आठवड्यात खरेदी केलेल्या मालाचीच आवक व विक्री सध्या सुरू आहे. ग्राहकांकडून मागणीही कमी असल्याने डाळींचे भाव घसरू लागले आहेत. घाऊक बाजारात हीच स्थिती कायम राहिल्यास पुढील आठवड्यातही डाळींचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Break to Turdali's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.