अतिक्रमण कारवाईला स्थायी समितीचाही ब्रेक
By Admin | Updated: June 12, 2015 06:12 IST2015-06-12T06:12:27+5:302015-06-12T06:12:27+5:30
शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू असलेली कारवाई अधिकृत व्यावसायिकांवर करू नये; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील,

अतिक्रमण कारवाईला स्थायी समितीचाही ब्रेक
पुणे : शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू असलेली कारवाई अधिकृत व्यावसायिकांवर करू नये; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दम स्थायी समितीच्या सदस्यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनास भरला. तसेच पालिकेने परवाना दिलेल्या व्यावसायिकांचे आधी पुनर्वसन करावे आणि नंतर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिक्रमण कारवाई आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू ठेवण्यात येतील. कोणावरही अन्याय होणार नाही, तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समिती सदस्यांना दिले.
गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अधिकृत, परवानाधारक स्टॉलधारकांवर कारवाई केली जात असल्याने त्याबाबत पालिकेच्या सभासदांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. बुधवारी स्वारगेट येथे सुरू असलेली कारवाई नगरसेवकांच्या हस्तेक्षेपानंतर थांबविण्यात आली. त्याचे पडसाद आज समितीच्या बैठकीत उमटले. अनेक सदस्यांनी महापालिकेच्या या कारवाईचा निषेध केला. पालिकेने मनमानी पद्धतीने हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसायाचे साधन नष्ट केले, तर बेरोजगारी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.