सायकल, शिलाई मशिन साहित्य खरेदीला ब्रेक

By Admin | Updated: July 3, 2015 00:28 IST2015-07-03T00:28:26+5:302015-07-03T00:28:26+5:30

सायकल आणि शिलाई मशिनची जादा दराने खरेदी करीत असल्याचे उघडकीस आणूनही त्याचे समर्थन करणाऱ्या सह आयुक्त दिलीप गावडे व मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर

A break from the purchase of bicycle, shilling machine material | सायकल, शिलाई मशिन साहित्य खरेदीला ब्रेक

सायकल, शिलाई मशिन साहित्य खरेदीला ब्रेक

पिंपरी : सायकल आणि शिलाई मशिनची जादा दराने खरेदी करीत असल्याचे उघडकीस आणूनही त्याचे समर्थन करणाऱ्या सह आयुक्त दिलीप गावडे व मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी घेराव घातला. खरेदीबाबत जाब विचारला. दोन्ही साहित्यखरेदी प्रक्रियेबाबत महापालिकेच्या दक्षता व नियंत्रण विभागाकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरेदीची पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
महापालिकेतर्फे महिलांना स्वयंरोजगारासाठी १३ हजार २९० शिलाई मशिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. बाजारात एका मशिनची किंमत ३ हजार ८३ रुपये आहे. मात्र महापालिका ४ हजार ७७७ रुपयांना एक मशिन खरेदी करणार आहे. त्यामुळे या खरेदीत दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी केला होता. तसेच संबंधित मशिन चायनामेड असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. महिलांची फसवणूक होणार असून, ती थांबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
तसेच केमिकल पुरवठ्याचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदाराकडून दहा हजार सायकलींच्या खरेदीचाही घाट घातला जात असून, साहित्य खरेदी रद्दची मागणीही त्यांनी केली होती. निविदा प्रक्रिया दर योग्यच असल्याचे सह आयुक्त, मुख्य लेखापरीक्षकांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे सावळे व शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर महिलांनी अधिकाऱ्यांना खरेदीचा जाब विचारला. घेराव घातला. या दोघांनाही खरेदी करीत असलेल्या मशिनचे आॅनलाइन दर या वेळी दाखविले. त्यानंतर मशिनचे दर १ हजार ६९५ रुपयांनी जादा असल्याचे अधिकाऱ्यांनी लेखी मान्य केले.
दक्षता व नियंत्रण विभागाकडून तापसणी करून खातरजमा झाल्यानंतरच शिलाई मशिन व सायकलींचा पुरवठा करण्याचे ठेकेदाराला आदेश देण्याचे लेखी पत्र सह आयुक्तांनी दिले आहे. या आंदोलनात सारिका पवार, नीता कुशारे, साक्षी काटकर, सरिता शर्मा, नंदा करे, हर्षा शिंदे, गीता महेंद्रू, आदिती क्षेत्री, जयश्री नवगिरे, जयंती गायकवाड, वंदना भडकवाड, स्वाती हुलावळे, अलका हुलावळे, शिल्पा मर्ढेकर, अनिता गुजर, सुनीता हिरोटे, मीना चांदणे, वंदना पारचा, सुनीता सोनवणे, संध्या पारचा, पूजा गायकवाड, मंगल म्हस्के, सोफिया खान, शर्मिला शिंदे, अश्विनी मोरे आदी सहभागी झाल्या.(प्रतिनिधी)

Web Title: A break from the purchase of bicycle, shilling machine material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.