सायकल खरेदीला स्थायीचाच ‘ब्रेक’

By Admin | Updated: January 21, 2015 00:26 IST2015-01-21T00:26:38+5:302015-01-21T00:26:38+5:30

पुणेकरांनी कररूपाने दिलेल्या निधीची विश्वस्त असलेल्या स्थायी समितीने कमी दराने सायकल खरेदी करण्यासच आक्षेप घेतला आहे.

'Break' for a Bicycle purchase | सायकल खरेदीला स्थायीचाच ‘ब्रेक’

सायकल खरेदीला स्थायीचाच ‘ब्रेक’

पुणे : पुणेकरांनी कररूपाने दिलेल्या निधीची विश्वस्त असलेल्या स्थायी समितीने कमी दराने सायकल खरेदी करण्यासच आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने कोणत्या अधिकारात हा निर्णय घेतला, असा सवाल सदस्यांनी विचारला आहे.
प्रशासनाने कोणत्या अधिकाराने सायकलींचे दर कमी केले, असा सवाल समिती सदस्यांनी विचारला आहे. त्यामुळे स्थायी समितीचा पैसे उधळपट्टीवरच भर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. २०१४-१५ वर्षासाठी ३ हजार ५२० रुपये प्रतिनग सायकल खरेदी अशी तब्बल ३ हजार ६७ सायकलींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ७ लाख ९५ हजार ८४० रुपयांची सायकल खरेदी करण्यात येणार आहे. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी जेन्ट्स-लेडीज अशा एकूण १ हजार १७६, प्राथमिकसाठी १ हजार १९१ तर नागरवस्ती विभागासाठी एकूण ७०० सायकलींची खरेदी करण्यात येणार आहे. या वर्षी एकाच ठेकेदाराने सायकली पुरविण्यासाठी निविदा भरली. त्याचा दर सुमारे ३८०० रूपये प्रतिसायकल होता. तर हा ठेकेदार मागील वर्षी सायकली पुरविणाराच होता. त्यामुळे प्रशासनाकडून तडजोड करून मागील वर्षीच्या दरानेच म्हणजेच ३,५२० रुपये दराने सायकली देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, या ठेकेदाराने तडजोडीने मागील दरानेच सायकली देण्यास मान्यताही दर्शविली. मात्र, हा विषय लक्षात न घेताच प्रशासनाने कोणत्या आधारावर मागील वर्षाचे दर ठेवले, अशी भूमिका स्थायी समितीमधील काही सदस्यांनी घेतली. (प्रतिनिधी)

सायकल ही मुलांसाठी महत्त्वाची बाब आहे. प्रशासनाने मागील वर्षीपेक्षा ३०० रुपयांची बचत होणार असल्याचे बैठकीत सांगितले. त्यामुळे हा खर्च आणखी कमी होईल. तसेच प्रशासनास तो कमी करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे तो पुढे ढकलला.
- बापूराव कर्णेगुरुजी,
स्थायी समिती अध्यक्ष

Web Title: 'Break' for a Bicycle purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.