बीपीओतील हार्ड डिस्कची होणार फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी

By Admin | Updated: February 10, 2016 03:29 IST2016-02-10T03:29:09+5:302016-02-10T03:29:09+5:30

फोनद्वारे अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील बीपीओतील हार्ड डिस्कची तपासणी फॉरेन्सिक लॅबकडून केली जाणार आहे.

BPO's hard disk will be examined by forensic lab | बीपीओतील हार्ड डिस्कची होणार फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी

बीपीओतील हार्ड डिस्कची होणार फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी

पुणे : फोनद्वारे अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील बीपीओतील हार्ड डिस्कची तपासणी फॉरेन्सिक लॅबकडून केली जाणार आहे. या तपासणीनंंतरच प्रत्यक्षात किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, हे स्पष्ट होईल.
बावधन येथील कोलते पाटील कॉम्प्लेक्समध्ये बीपीओ चालविणाऱ्या तिघांचा सायबर शाखेने सोमवारी पर्दाफाश केला. या गुन्ह्यात आदित्य राठी, हरीश खुशलानी, रितेश नवानी या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघे यापूर्वी कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना एका औषधाची विक्री करत होते. त्या माध्यमातून त्यांनी तेथील नागरिकांची माहिती मिळवली आहे. तसेच, अमेरिकेतील डेटा प्रोव्हायडरकडून त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या ग्राहकांची माहिती मिळविली असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी कॉलसेंटरवर छापा टाकून दोन हार्डडिस्क जप्त केल्या आहेत. त्या पोलिसांच्या सायबर लॅबकडे तपासणीसाठी दिल्या आहेत. तसेच, अधिक तपासासाठी या हार्डडिस्क फॉरेन्सिक लॅबकडेही पाठविल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून या कॉलसेंटरमधून किती जणांना फोन गेले, बँकिंग व्यवहार किती झाले, अमेरिकेसह इतर देशांतील नागरिकांची फसवणूक झाली आहे का, याची माहिती सायबर लॅबकडून मिळणार आहे. त्यातून या प्रकरणाचा आवाका समोर येईल, असे सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले.

मायक्रोसॉफ्टला नोटीस
मायक्रोसॉफ्टच्या नावाने बोगस बीपीओ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर सेलने कंपनीच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. मात्र तरीही कंपनीकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी पोलिसांनीच छापा टाकून गुन्हा दाखल केला. त्यानंतरही सेलच्या वतीने कंपनीला उपस्थिर राहण्याबाबत कळविण्यात आले. पण कंपनीकडून केवळ ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला.
सायबर शाखेने मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: BPO's hard disk will be examined by forensic lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.