अध्यक्षांचाच बैठकीवर बहिष्कार
By Admin | Updated: December 23, 2015 00:13 IST2015-12-23T00:13:57+5:302015-12-23T00:13:57+5:30
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहन पुरविण्याच्या टेंडर मान्यतेवरून स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसनेच्या सदस्यांमध्ये मंगळवारी जोरदार खडाजंगी झाली

अध्यक्षांचाच बैठकीवर बहिष्कार
पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहन पुरविण्याच्या टेंडर मान्यतेवरून स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसनेच्या सदस्यांमध्ये मंगळवारी जोरदार खडाजंगी झाली. यावरून कदम या बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडल्या. त्यानंतर सदस्यांनी सभा पुढे चालू ठेवून वाहन पुरविण्याचा विषय मंजूर करून घेतला. स्थायी समितीच्या बैठकांमध्ये वारंवार होणाऱ्या वादामुळे प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
महापालिकेच्या स्थानिक संस्था कर, पाणीपुरवठा, क्षेत्रीय कार्यालये व मनपाकडील इतर विभागांना शासकीय कामांसाठी भाडेतत्त्वावर वाहने पुरविण्याचे दोन प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडले होते. यापूर्वी ४ वेळा हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीत हा विषय आला असता, प्रशासनाने त्या विषयावर अद्याप अहवाल दिला नसल्याने तो पुढे ढकलावा, अशी भूमिका अश्विनी कदम यांनी घेतली.
स्थायी समितीमधील काँग्रेस, भाजप, मनसे व शिवसेनेच्या सदस्यांनी याला आक्षेप घेतला. प्रशासकीय काम वेगाने मार्गी लावण्यासाठी हा विषय मंजूर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. समितीच्या अध्यक्षांनी या विषयावर मतदान घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्याला कदम यांनी नकार दिला. हा विषय आपण मतदानाला टाकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बैठकीचे कामकाज अर्धा तास थांबून राहिले. त्यानंतर समितीचे काही सदस्य आपणास जाणूनबुजून टार्गेट करीत असल्याचा आरोप करून कदम यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
बैठक तहकूब झाली नसल्याने इतर पक्षांच्या सदस्यांनी सभा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रसचे सदस्यही बैठकीतून बाहेर पडले. इतर पक्षांच्या सदस्यांनी समितीमधील ज्येष्ठ सदस्य मुकारी अलगुडे यांची बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवड करून सभेच्या पुढील कामकाजाला सुरुवात केली. अधिकाऱ्यांना वाहन पुरविण्याचा एक कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बैठकीतून बाहेर पडल्यानंतरही ५ पेक्षा जास्त सदस्य बैठकीला उपस्थित असल्याने कोरम पूर्ण होत असल्याने अध्यक्षांच्या बहिष्कारानंतर झालेले कामकाज नियमानुसार झाल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)