भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात बोगदा

By Admin | Updated: January 23, 2017 02:50 IST2017-01-23T02:50:31+5:302017-01-23T02:50:31+5:30

भामा-आसखेड धरणात नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाचा (कंट्रोल ब्लास्टिंग) वापर करून २१० मीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

Bound in the water of Bhama-Aakshhed dam | भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात बोगदा

भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात बोगदा

पुणे : भामा-आसखेड धरणात नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाचा (कंट्रोल ब्लास्टिंग) वापर करून २१० मीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. पालिका प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करीत असून, त्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला तरीही जॅकवेलमधून उपलब्ध पाण्याचा उपसा करणे शक्य होणार आहे. सध्या जॅकवेलचे काम सुरू असून ते पूर्ण झाले, की येत्या काही महिन्यांत धरणातील पाण्यात हे नियंत्रित स्फोट करण्यात येतील.
पुण्याच्या पूर्व भागाला म्हणजे विश्रांतवाडी ते संगमवाडी, लोहगाव या परिसराला पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पालिकेने भामा-आसखेड धरणातून ही पाणी योजना प्रस्तावित केली आहे. धरणातील अगदी तळाचा शिल्लक पाणीसाठाही उचलता यावा, यासाठी बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. जॅकवेलपासून धरणाच्या मध्य भागापर्यंत बोगदा असेल. पाण्यापासून सुमारे ३४ मीटर खोलीवर हे काम होईल. पाणी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून हेही काम करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना आयटीडी ही अशा नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी मार्गदर्शन करणार आहे.
पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे व या प्रकल्पाचे काम पाहणारे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले, की धरणातील पाणीसाठा कमी झाला, की जॅकवेलमधून पाण्याचा उपसा करणे अवघड होते. असे होऊ नये, यासाठी आधीच काळजी घेण्यात येत आहे. धरणाच्या एका बाजूला असणाऱ्या जॅकवेलची पाण्यातील बाजू धरणाच्या तळाच्याही खाली असेल. या बाजूकडून ते धरणाच्या सर्वाधिक खोलवर बाजूपर्यंत हा बोगदा असेल. त्याचा व्यास साधारण १० फूट इतका असणार आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला, तरी या बोगद्यातून पाणी थेट जॅकवेलपर्यंत येईल व तिथून त्याचा उपसा करता येईल.
कंट्रोल ब्लास्टिंग हे आधुनिक तंत्रज्ञान असून भूस्तरात खोलवर असलेले पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. पाण्याखाली स्फोट घडवून आणून त्यातून टनेल तयार करण्याचे काम त्यापेक्षा क्लिष्ट आहे. धरणात ३४ मीटर खोलीवर करण्यात येणारा बोगदा २१० मीटर लांबीचा व १० फूट व्यासाचा असल्याने एकापेक्षा जास्त स्फोट करावे लागणार आहेत. त्याचे आरेखन झाले, की स्फोटांची पूर्वतयारी करण्यात येईल, अशी माहिती गेडाम यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Bound in the water of Bhama-Aakshhed dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.