गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक
By Admin | Updated: June 17, 2015 01:19 IST2015-06-17T01:19:46+5:302015-06-17T01:19:46+5:30
वडगाव धायरी येथे एका इस्टेट एजंटवर गोळीबार व धारधार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधीपथकाने अटक केली

गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक
पुणे : वडगाव धायरी येथे एका इस्टेट एजंटवर गोळीबार व धारधार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधीपथकाने अटक केली. त्यांच्या कडून पिस्तूल आणि जिवंत काडतूसही जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर जबरी चोरी, अपहरणाचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अभिजित ऊर्फ बटऱ्या बाळासाहेब गाडे (वय २४, रा. मु. पो. बावी, ता. माढा, जि. सोलापूर, सध्या रा. देडगे कॉर्नर, किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे) व समीर राजाराम गवस (वय २७, रा. वाबळेचाळ, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
ही घटना २४ मे रोजी घडली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील तपास करीत असताना, त्यांना दोन व्यक्ती पिस्टल बाळगून असून, ते सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून गाडे व गवस या दोघांना पकडले आणि त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पी. आर. पाटील, सहआयुक्त राजेंद्र जोशी, निरीक्षक अनिल पाटील, सहायक पोलीस विठ्ठल शेलार, कर्मचारी संजय काळोखे, गणेश माळी, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, प्रशांत पवार, नीलेश देसाई, सिद्धार्थ लोखंडे, नागनाथ गवळी, चंद्रकांत सावंत यांनी केली.(प्रतिनिधी)