सचिन जाधव खूनप्रकरणातून दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST2021-05-28T04:09:40+5:302021-05-28T04:09:40+5:30
बळशिराम दगडू थिटे (रा.धामणी), विजय अनिल सूर्यवंशी (रा.जाधववाडी), निलेश दादाभाऊ बर्डे, निलेश मारुती माळी (दोघे रा.पिंपरखेड) व काजल रमेश ...

सचिन जाधव खूनप्रकरणातून दोघांना अटक
बळशिराम दगडू थिटे (रा.धामणी), विजय अनिल सूर्यवंशी (रा.जाधववाडी), निलेश दादाभाऊ बर्डे, निलेश मारुती माळी (दोघे रा.पिंपरखेड) व काजल रमेश दाते (रा.कवठे येमाई) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन राजाराम जाधव यांचा आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने खून करण्यात आला आहे. आरोपी बळशिराम थिटे, विजय अनिल सूर्यवंशी, निलेश दादाभाऊ बर्डे, निलेश मारुती माळी व काजल रमेश दाते यांनी सचिन जाधव याला पोंदेवाडी फाटा येथील कमानीजवळ बोलावून घेतले. डोक्यात हत्याराने निर्घुण वार करून त्याला ठार मारण्यात आले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सचिन जाधव यांचा मृतदेह कोरठण खंडोबा येथे टाकून पेटवून देण्यात आला. तसेच तो वापरत असलेले वाहन (एम एच १४ एच डब्ल्यू ३८७२) हे पिंपळगाव रोठा येथील स्मशानभूमीजवळ पेटवून देण्यात आले आहे. पोंदेवाडी काठापूर रस्त्यालगत एका ठिकाणी रक्ताचे शिंतोडे व चपलांचा जोड तसेच कंगवा मिळाल्यानंतर खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मंचर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
या प्रकरणातील आरोपी बळशिराम दगडू थिटे, विजय अनिल सूर्यवंशी, निलेश दादाभाऊ बर्डे, निलेश मारुती माळी यांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. काजल रमेश दाते यांना सायंकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे, आदिनाथ लोखंडे यांनी तपासाची सूत्रे हलविली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करत आहे.