रस्त्यावरील चिमुकल्यांच्या हाती पुस्तके

By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:01+5:302016-01-02T08:37:01+5:30

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यावरील चिमुकल्यांना अजूनही फुगे, बाहुल्या, फुले, पोस्टर विकून जीवन कंठावे लागत आहे. हलाखीच्या परिस्थितीपुढे हात टेकलेल्या या चिमुकल्यांना

Books on the Roads of the Moments | रस्त्यावरील चिमुकल्यांच्या हाती पुस्तके

रस्त्यावरील चिमुकल्यांच्या हाती पुस्तके

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यावरील चिमुकल्यांना अजूनही फुगे, बाहुल्या, फुले, पोस्टर विकून जीवन कंठावे लागत आहे. हलाखीच्या परिस्थितीपुढे हात टेकलेल्या या चिमुकल्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे; परंतु आता परिस्थिती बदलत असून, या मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून, त्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे.
जनसेवा फाउंडेशनतर्फे भीक मागणाऱ्या चिमुकल्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत रस्त्यांवरील जवळपास ५०० मुलांना एकत्रित करून वेगवेगळ्या भागातील शाळांमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. तसेच, ४० मुलांना दत्तक घेण्यात आले असून, त्यांना जनसेवा फाउंडेशनच्या निराधार पुनर्वसन केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा संपूर्ण खर्च फाउंडेशनतर्फे केला जातो.
कल्याणीनगर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कर्वेनगर, कोथरूड, कात्रज, आंबेगाव, वाघोली या ठिकाणच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. काही पालक मुलांना शिकविण्यास तयार नव्हते. त्यामुळे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना सर्वप्रथम पालकांना विश्वासात घ्यावे लागले, तर काही पालकांनी आपल्या मुलाला निदान बसवरील नाव तरी वाचता येईल, अशी भावना व्यक्त केली.

नूतन समर्थ विद्यालय, रविवार पेठ, दिग्विजय प्राथमिक विद्यामंदिर धनकवडी, सानेगुरुजी विद्यालय, कृष्णाजी मोरे प्राथमिक विद्यालय, सम्राट अशोक विद्यालय कर्वे रोड, पीएमसी स्कूल अशा पुण्यातील खासगी व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण ४८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

भीक मागणाऱ्या मुलांसाठी फार कमी लोक पुढे येऊन काम करतात. त्यांना केवळ तात्पुरती मदत केली जाते. जनसेवा फाउंडेशनतर्फे राबविलेला हा उपक्रम या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. या मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, तर नक्कीच ही मुले देखील खूप पुढे जाऊ शकतील.
- माधुरी मिसाळ, आमदार

भीक मागणाऱ्या मुलांना शाळेत जाण्यासाठी राजी करणे खरंच खूप अवघड गेले. आम्ही शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निरीक्षण केले. अशा मुलांना एकत्र करून, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांना शाळेत दाखल करण्यापासून ते साहित्य देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी संस्थेने घेतली.
- भारती पाटील, प्रोग्रॅम को-आॅर्डिनेटर

Web Title: Books on the Roads of the Moments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.