फटाक्याचे पैसे वाचवून विद्यार्थ्यांनी जमविली पुस्तके
By Admin | Updated: November 14, 2016 02:15 IST2016-11-14T02:15:55+5:302016-11-14T02:15:55+5:30
भोरवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबविला

फटाक्याचे पैसे वाचवून विद्यार्थ्यांनी जमविली पुस्तके
जेजुरी : भोरवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबविला आहे.
विद्यार्थ्यांनी दिवाळी सणात फटाके न वाचविता वाचलेल्या पैशातून पुस्तके खरेदी करून शाळेत जमा केली. जमा झालेल्या पुस्तकातून शाळेत बालवाचनालय सुरु करण्यात आले. भोरवाडी येथील प्राथमिक शाळेत गुणवत्तावाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. कात्रणचित्राचे वाचनालय, पर्यावरणावर आधारित नाटकांचे आयोजन, सण-समारंभाचे आयोजन, हस्तलिखित निर्मिती आदी उपक्रम शाळेत राबविले जात असल्याचे मुख्याध्यापक विलास बोरावके यांनी सांगितले.
यंदाच्या दिवाळीत फटाके न वाजविता शाळेसाठी पाच पुस्तके भेट म्हणून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळा भरल्यानंतर पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्वच मुलांनी गोष्टीची व इतर अशी सुमारे दोनशे पुस्तके जमा केली. शिक्षकांच्याकडे ही पुस्तके सुपूर्त केली. त्यामध्ये गोष्टीची पुस्तके, संस्कारगीते, संतांची चरित्रे, म्हणींच्या गोष्टी, माहितीची पुस्तके यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक विलास बोरावके व शिक्षिका सोनाली गिरमे यांनी या पुस्तकांचा संग्रह करून व त्यामध्ये इतर काही पुस्तके मिसळून बालवाचनालय सुरु केले आहे.
विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बालवाचनालयामुळे वाचन समृद्धी उपक्रम यशस्वीपणे राबविता येणार असल्याचे उपशिक्षिका सोनाली गिरमे यांनी सांगितले.