‘ते’ वक्तव्य लिहिले पुस्तकात

By Admin | Updated: February 10, 2017 03:01 IST2017-02-10T03:01:23+5:302017-02-10T03:01:23+5:30

टॅक्सेशन एन्क्वायरी कमिटीच्या रिपोर्टवरील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिक्रियेबद्दलचे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी माझ्याजवळ केले होते

In the book 'he' statement written | ‘ते’ वक्तव्य लिहिले पुस्तकात

‘ते’ वक्तव्य लिहिले पुस्तकात

पुणे : टॅक्सेशन एन्क्वायरी कमिटीच्या रिपोर्टवरील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिक्रियेबद्दलचे वक्तव्य यशवंतराव चव्हाण यांनी माझ्याजवळ केले होते. माझ्या पुस्तकात तोच प्रसंग मी लिहिला असून, गांधी यांच्याशी झालेल्या गोपनीय चर्चेच्या वेळी मी उपस्थित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
‘अनफिनिश्ड इनिंग्ज’ या गोडेबोले लिखित १९९६मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील चर्चेच्या दरम्यान केला. काँग्रेसच्या एका खासदाराने गोडबोले गोपनीय चर्चेच्या वेळी कसे उपस्थित असू शकतात, असा प्रश्न करून शंका उपस्थित केली आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री आणि वित्तमंत्री असताना गोडबोले त्यांचे खासगी सचिव होते.
गोडबोले म्हणाले, हा विषय संवेदनशील असल्याने चव्हाण यांनी गांधी यांची भेट घेतली व समितीची शिफारस त्यांना कथन केली. त्यावर गांधी यांनी या विषयाची अंमलबजावणी केल्यावर काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की नाही? अशी प्रतिक्रिया दिली होती. आपण चव्हाण यांचे सचिव असल्याने त्यांनी ही बाब आपल्याला सांगितली होती.मोदी यांनी माझ्या पुस्तकातील या प्रसंगाचा संसदेत उल्लेख केला. त्यानिमित्ताने या पुस्तकाची चर्चा झाली. (प्रतिनिधी)

Web Title: In the book 'he' statement written

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.