बॉम्बच्या अफवेने खळबळ
By Admin | Updated: March 3, 2015 01:16 IST2015-03-03T01:16:28+5:302015-03-03T01:16:28+5:30
सिंहगड रस्त्यावर आढळलेल्या बेवारस पिशवीमुळे बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी घेतलेल्या मॉक ड्रीलमुळे जवळपास तासभर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती.

बॉम्बच्या अफवेने खळबळ
पुणे : सिंहगड रस्त्यावर आढळलेल्या बेवारस पिशवीमुळे बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी घेतलेल्या मॉक ड्रीलमुळे जवळपास तासभर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) तपासणी केल्यानंतर या पिशवीत एक स्टॅबीलायझर मिळून आला.
सिंहगड रस्त्यावरील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराशेजारी बसथांब्याच्या पदपथावर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक बेवारस पिशवी मिळून आली होती. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पोलिसांना माहिती मिळताच बीडीडीएसला पाचारण करण्यात आले. दत्तवाडी आणि सिंहगड रोड पोलिसांनी याठिकाणी तातडीने बंदोबस्त देऊन जागा रिकामी करुन घेतली. रस्त्याच्या एका बाजुची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
बीडीडीएसच्या जवानाने बॉम्ब सुट परीधान करुन दोरीच्या सहाय्याने पिशवी उघडली. त्यामध्ये आढळून आलेल्या स्टॅबीलायझरचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने स्कॅनिंग करण्यात आले. कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यावर हे मॉक ड्रील थांबवण्यात आले.
हे संपुर्ण ड्रील सुरु असताना बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अनेकांनी व्हॉट्स अॅपवरुनच तेथील फोटो काढून पाठवून दिले. तसेच बॉम्ब सापडल्याचा संदेशही प्रसारीत करायला सुरुवात केली. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती.