ग्राहकांच्या नावावर बोगस बुकिंग
By Admin | Updated: August 21, 2015 02:35 IST2015-08-21T02:35:35+5:302015-08-21T02:35:35+5:30
एच.पी.चा गॅस सिलिंडरच घेत नसताना व संबंधित बँकेत खाते व आधार लिंक केले नसतानाही विश्रांतवाडी येथील दीपक रामचंद्र त्रिभुवन यांच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला गॅस सिलिंडरचे

ग्राहकांच्या नावावर बोगस बुकिंग
सुषमा नेहरकर-शिंदे, पुणे
एच.पी.चा गॅस सिलिंडरच घेत नसताना व संबंधित बँकेत खाते व आधार लिंक केले नसतानाही विश्रांतवाडी येथील दीपक रामचंद्र त्रिभुवन यांच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला गॅस सिलिंडरचे अनुदान जमा होत आहे. तसेच कोथरूड येथे एकाच कुटुंबाला पाच महिन्यांत तब्बल तीस गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा आणि दर महिन्याला गॅस सिलिंडर घेतला नसतानाही परस्पर गॅस बुकिंग करून तो दुसऱ्यालाच विक्री करण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडकीस आले आहेत. ग्राहकांच्या नावावर बोगस बुकिंग करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या गॅस एजन्सींचा बोगस कारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे.
शासनाने गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी गॅस सिलिंडर आधार व बँक लिंक करण्याचा निर्णय घेतला. यात गॅस कंपन्यांना देण्यात येणारे अनुदानाचे पैसे आता थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे गॅस सिलिंडरचा काळ्याबाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत झाली आहे. परंतु गॅस सिलिंडरचा काळाबाजार करण्यासाठी गॅस एजन्सींकडून अनेक नामी शक्कल शोधून काढल्या जात आहेत. यात थेट ग्राहकांच्या नावे बोगस बुकिंग करून घरगुती वापराचे गॅस सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना दुप्पट किमतीत विकण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. विश्रांतवाडी येथील त्रिभुवन यांच्या पत्नीच्या नावावर भारत गॅस आणि एच.पी. असे दोन गॅस कनेक्शन होते. आधार लिकिंगमुळे त्यांनी सन २०१२ मध्ये आपले एच.पी.च्या गॅस सिलिंडरचे कनेक्शन बंद केले. परंतु, आता गॅस सिलिंडरचे कनेक्शन बंद केले असताना व आयडीबीआय बँकेत खाते नसताना त्रिभुवन यांच्या नावावर गॅस सिलिंडरचे अनुदान जमा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड येथील एका गॅस एजन्सीने एकाच कुटुंबात बोगस व्यक्तींच्या नावे गॅस बुकिंग करून पाच महिन्यांत एका कुटुंबाला तब्बल तीस गॅस सिलिंडर वितरित केल्याचे समोर आले. तर गॅस सिलिंडरची नोंदणी केली नसताना नियमित गॅस न घेणाऱ्या ग्राहकांच्या नावावर परस्पर गॅस नोंदणी करून घरगुती वापराचा गॅस सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना काळ्याबाजाराने विक्री करणाऱ्या सांगवी येथील वंदना भारत गॅस एजन्सीचा बोगस कारभार ‘लोकमत’ने समोर आणला आहे.