बोट धरून चालणारे आता गाडायला निघाले

By Admin | Updated: January 31, 2017 04:21 IST2017-01-31T04:21:42+5:302017-01-31T04:21:42+5:30

बोट धरून गेली २५ वर्षे चालणारे आम्हाला आता गाडायला निघाले आहेत, अशा शब्दांत भाजपावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक टीका करीत जुन्या

The boat holders are now going to drive | बोट धरून चालणारे आता गाडायला निघाले

बोट धरून चालणारे आता गाडायला निघाले

पुणे : बोट धरून गेली २५ वर्षे चालणारे आम्हाला आता गाडायला निघाले आहेत, अशा शब्दांत भाजपावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक टीका करीत जुन्या पिढीतील शिवसैनिकांनी ‘मतदानाच्या दिवशी आम्हीच तुम्हाला पाणी पाजू,’ असा इशारा रविवारी येथे दिला.
कर्वेनगर येथे आयोजित केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार, शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर, रमेश बोडके, जगन्नाथ परदेशी, राजाभाऊ रायकर, निर्मला केंडे, श्याम देशपांडे, अनिल गोरे आदी व्यासपीठावर होते.
नंदू ऊर्फ भाऊसाहेब घाटे म्हणाले, ‘‘युती तुटल्यामुळे
शिवसेना आता गल्लीबोळांत जाईल. युती होऊ नये, असेच आपण २५ वर्षांपासून सांगत होतो. आता
सेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात खुर्ची टाकून प्रचार करावा.’’
सुतार म्हणाले, ‘‘आम्हाला संपविण्याच्या वल्गना होत आहेत; पण शिवसेना हा वटवृक्ष आहे. अनेकांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, दगाबाजी केली; पण शिवसेना भक्कम उभी आहे.’’
जगन्नाथ परदेशी म्हणाले, ‘‘शिवसेना हे ५० वर्षांचे झाड आहे. त्याची फांदी जरी कापायचा प्रयत्न कराल, तर हात छाटू. शिवसेनेवर टीका करताना शनिवारी फडणवीस यांना पाणी प्यावे लागले. मतदानाच्या दिवशी आम्हीच त्यांना पाणी पाजू.’’
रमेश बोडके म्हणाले, ‘‘आम्ही रस्त्यावरची माणसे आहोत. फडणवीस यांच्या अंगावरची मुख्यमंत्रिपदाची झूल आमच्यावर टीका करीत आहे.’’
निर्मला केंडे म्हणाल्या, ‘‘शिवसेना या ४ अक्षरांचा
आम्हाला अभिमान आहे. आम्ही पदांसाठी, नावासाठी काम केले नाही. आमचे बोट धरून मोठा झालेला भाजप आम्हाला गाडायला निघाला आहे; पण आम्हीच त्यांना गाडू.’’
निम्हण म्हणाले, ‘‘युती तोडावी किंवा नाही, यासाठी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा कौल घेतला. ज्येष्ठांनी सहकार्य केल्याशिवाय पालिकेवर भगवा फडकवता येणार नाही.’’
गुलटेकडी परिसरातील मातंग, मुस्लिम स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विजय ठकार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The boat holders are now going to drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.