महिलांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा विशेष कृती आराखडा : महापौर मोहोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST2021-09-17T04:15:42+5:302021-09-17T04:15:42+5:30

पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे़ ...

BMC's special action plan for women's safety: Mayor Mohol | महिलांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा विशेष कृती आराखडा : महापौर मोहोळ

महिलांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा विशेष कृती आराखडा : महापौर मोहोळ

पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे़ यासंदर्भात महापालिका पोलिसांसमवेत विशेष कृती आराखडा तातडीने तयार करणार आहे़, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका पदाधिकारी अधिकारी यांची पोलीस दलासमवेत बैठक आयोजिली होती़ त्यानंतर महापौर पत्रकारांशी बोलत होते़ बैठकीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे सर्व पक्षनेते व अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, पुणे महापालिकेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार शाळेची मैदाने, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसर, स्वारगेट बसस्थानक, शिवाजीनगर बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच अंधार असलेल्या भागात विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच खासगी आणि सरकारी शाळांमध्ये संस्कारवर्ग, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्पर्शज्ञान यासाठी विशेष प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हॅन यांच्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात येणार आहे़ तर सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीएमएल त्याचबरोबर आरटीओची मदत घेतली जाणार आहे. तसेच लॉज, हॉटेल यांच्याकरितादेखील कडक नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले़ दरम्यान, शहरातील परप्रांतीय नागरिक यांची माहिती संकलित करण्याबरोबरच बेघर व रस्त्यांवर राहणाऱ्या व्यक्तींवरही वॉच ठेवण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़

-----------

Web Title: BMC's special action plan for women's safety: Mayor Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.