महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त १७८ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:09 IST2021-04-12T04:09:20+5:302021-04-12T04:09:20+5:30
राज्यात एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने या भरारी ग्रुपच्या माध्यमातून घेतला. रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार ...

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त १७८ जणांचे रक्तदान
राज्यात एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने या भरारी ग्रुपच्या माध्यमातून घेतला. रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार असेल तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने तरूणाईने रक्तदान करायलाच हवे, असा संकल्प भरारी ग्रुपच्या वतीने कोरोना महामारी काळात केला आहे. कोरोना या विषाणूने जगात थैमान घातल्याने कोरोनाबाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासू लागली आहे. राज्यातील सर्व रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यामधे रक्तसाठा अल्प प्रमाणात आहे. रक्तदान ही काळाची गरज आहे. रक्तपुरवठ्याच्या तुटवडावर मात करण्यासाठी शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या सहकार्याने बाणेरे येथील सोमेश्वर मंदिर येथे भरारी ग्रुपने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी ठेवली होती.
सर्व रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. शिबिरामधे ४१ नवीन रक्तदात्यानी प्रथमच रक्तदान केले. पोलिस, युवक युवती व नागरिक यानी आवर्जून सहभाग नोंदविला. आयआरबीचे रिजनल मॅनेजर प्रदीप शहा, चार्टर्ड अकाउंटट सचिन वास्कर, डॉ. विनित गांधी, ‘आम्ही सांगलीकर’चे अध्यक्ष अरुण कदम यांनी भेट देऊन कौतुक केले.
भरारी ग्रुपचे दीपक पाटील, विनित शिंदे, प्रशांत पाटील, शैलेश घाडगे, स्वप्निल डोळस, विशाल पाटील, भगवान खसे, रोहन तावरे, संतोष इंगळे, महेश कदम, नामदेव शेलार, रवींद्र कोथेरे, ऐश्वर्या पुजारी, वृषाली राजहंस, शुभदा भोसले आदींनी परिश्रम घेतले. भरारी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष सातपुते यानी आयोजन केले होते.
फोटो - क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भरारी ग्रुपच्या वतीने आयोजित शिबिरात १७८ रक्तदात्यानी रक्तदान करुन मोठा प्रतिसाद दिला.