मद्यपी वडिलांचा मुलाकडून खून
By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:02+5:302016-01-02T08:37:02+5:30
दारूच्या नशेत पत्नी आणि मुलाला सतत शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर येथील

मद्यपी वडिलांचा मुलाकडून खून
पुणे : दारूच्या नशेत पत्नी आणि मुलाला सतत शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर येथील माळवाडी भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय शंकर वेताळ (वय ४२, रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सागर (वय २४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर नवनाथ शंकर वेताळ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ यांचा हडपसर भाजी मंडईमध्ये गाळा आहे. त्यांचा मोठा भाऊ दत्तात्रय व विठ्ठल माळवाडी भागात शेजारी राहण्यास आहेत, तर त्यांची चुलतीही तेथेच शेजारी राहते. सुरुवातीला हडपसर जकातनाका येथे मिळेल ते काम, तसेच हमाली करणारे दत्तात्रय अलीकडे जास्त प्रमाणात दारू प्यायला लागले होते. तसेच कोणताही कामधंदा करीत नव्हते.
त्यांचा मुलगा सागर अॅमेनोरा मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो, तर सुनंदा या अॅमेनोरामध्ये साफसफाईची कामे करतात. दत्तात्रय त्यांच्या पत्नी व मुलाला दारू पिऊन नेहमी त्रास देत असत. त्यामुळे त्यांच्यात सतत वादविवाद व्हायचे. गुरुवारी रात्री दत्तात्रय यांनी दारू पिऊन पत्नीस शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्यानंतर शुक्रवारीही शिवीगाळ केली. त्यामुळे सागर आणि त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली. चिडलेल्या सागरने त्यांचा गळा दाबून खून केला. हडपसर पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आहे.