शंभराच्या नव्या नोटेची नाकाबंदी
By Admin | Updated: November 16, 2016 03:34 IST2016-11-16T03:34:32+5:302016-11-16T03:34:32+5:30
शहरात नव्या शंभराच्या नोटेचा पुरवठा बँकांना अत्यंत अल्प स्वरूपात होत असल्याने बहुतांश बँकांमध्ये शंभराच्या चलनाचा तुटवडा निर्माण झाला

शंभराच्या नव्या नोटेची नाकाबंदी
पुणे : शहरात नव्या शंभराच्या नोटेचा पुरवठा बँकांना अत्यंत अल्प स्वरूपात होत असल्याने बहुतांश बँकांमध्ये शंभराच्या चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सुट्ट्यासाठी नागरिकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना बळी पडावे लागत असल्याचे चित्र होते. त्यातच बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांनाच कमी पैसे आल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या सहकारी बँकांनाही कमी निधीचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील अनेक एटीएम केंद्र मंगळवारीदेखील बंद होती. रक्कम असणाऱ्या एटीएममध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विविध बँकांच्या शाखांमध्येही जुन्या एक हजार व पाचशेच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काही बँकांमध्ये केवळ दोन हजाराच्याच नोटा असल्याने, ग्राहकांना चार हजार रुपये देण्यात येत होते. शंभराच्या सुट्ट्या नोटा नसल्याने बँक कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.
काही बँकांनी आपल्या कॅश काऊंटरची संख्या एक अथवा दोनने वाढविली आहे. चलन रद्दचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच अत्यल्प रक्कम वितरणासाठी आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरासरी विविध बँकांमध्ये होणाऱ्या रोख व्यवहारांमध्ये जवळपास १५ पट वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत मंगळवारी केवळ २० टक्केच रकमेचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनाच कमी रक्कम प्राप्त झाली. त्याचा परिणाम एटीएम केंद्रांवरील रक्कमेवरदेखील झाला. परिणामी राष्ट्रीयीकृत बँकांशी संलग्न असलेल्या बँकांना मागणीच्या तीस टक्के रकमेचाच पुरवठा करण्यात येत होता. बँकांकडे असलेल्या जुन्या शंभराच्या नोटादेखील वाटून संपल्या आहेत. त्यामुळे शंभराच्या नोटेचा पुरवठा न वाढल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता अधिकारी वर्तवित आहेत.
दरम्यान, वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी काही बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांकडून समुपदेशन केले जात आहे. तर गर्दीतील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी चहापान, बिस्किटांची सोयदेखील काही बँकांत करण्यात आली आहे. या शिवाय ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्य दिले जात असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)