काही संघटनांना हाताशी धरून विरोधकांकडून ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:54+5:302021-03-15T04:11:54+5:30
इंदापूर : भाजपाच्या इंदापूर पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांच्या कामावर आक्षेप नोंदवत जे निवेदन सादर केले ते चुकीचे असून, विरोधक इंदापूर ...

काही संघटनांना हाताशी धरून विरोधकांकडून ब्लॅकमेल
इंदापूर : भाजपाच्या इंदापूर पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांच्या कामावर आक्षेप नोंदवत जे निवेदन सादर केले ते चुकीचे असून, विरोधक इंदापूर शहरातील जनतेची दिशाभूल करत आहेत. काही संघटनांना हाताशी धरुन इंदापूर शहरात हे ब्लॅकमेलिंगचे प्रकार चालू आहेत, असा गंभीर आरोप इंदापूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन गवळी यांनी केला आहे.
इंदापूर बांधकाम विभागास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दि. १२ मार्च रोजी निवेदन सादर केल्यानंतर इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दि.१४ रोजी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेत भाजपावर बेधडक टीका केली आहे. यावेळी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, गटनेते गजानन गवळी, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक स्वप्निल राऊत, अमर गाडे, अनिकेत वाघ, प्रशांत शिताप, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, शहर युवकाध्यक्ष अरबाज शेख, वसीम बागवान आदी उपस्थित होते.
गजानन गवळी म्हणाले की, शहरात चालू असलेल्या विकासकामांचेच बिल अदा करण्यात येणार आहे. जनतेच्या हिताचे काम होत असताना उगाच कोणीतरी उठून राज्यमंत्र्यांवर आरोप करत आहे. बोलणाऱ्याने आपल्या पदाला शोभल असेच बोलावे. इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासनिधी येत असताना काही विकृत वृत्तीची माणसे हा प्रकार घडवून आणत आहेत. माहिती हवी असल्याचा माहिती अधिकाराचा वापर करा परंतु कामे बंद पाडून जनतेस वेठीस धरु नका, असेही ते म्हणाले.
विरोधकांचे टक्केवारीचे कमिशन बुडाले असल्याने तरफड
बाळासाहेब ढवळे
विरोधकांनी त्यांच्या वीस वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात इंदापूरचे बकालपूर केले. गेल्या साडेचार वर्षांत इंदापूर नगरपरिषदेत तेच बोगस ठेकेदार व कमिशन मागणाऱ्या सत्ताधारी यांना नगराध्यक्षांनी पाठीशी घातले आहे. विकासकामात आडकाठी आणण्यापेक्षा कामे गुवणत्तात्मक करुन घ्या, आम्ही याचे स्वागत करु, इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभाग शहरातील कामे करत आहे. त्यामुळे विरोधकांचे काही टक्के कमिशन बुडाले आहे. त्यामुळे त्यांची तरफड चालू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केला आहे.
१४ इंदापूर पत्रकार परिषद
इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी.