शेतकऱ्यांकडे काळा पैसा येणार कुठूून?
By Admin | Updated: November 14, 2016 06:51 IST2016-11-14T06:51:37+5:302016-11-14T06:51:37+5:30
काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर अधिक प्रभावी होऊ शकेल. आजच्या व्यवस्थेमुळे

शेतकऱ्यांकडे काळा पैसा येणार कुठूून?
पुणे : काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर अधिक प्रभावी होऊ शकेल. आजच्या व्यवस्थेमुळे आणि व्यवस्थेतील चुकांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच राहत नाही, तर काळा पैसा कुठून येणार? असा प्रश्न अभिनेते, नाम फाउंशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला़ भ्रष्टाचाऱ्याचा काळा पैसा शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी नाम फाउंडेशनला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला़ त्यावेळी ते बोलत होते. कोहीनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, मयूरेश वैद्य, नैनिश देशपांडे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली.
अनासपुरे म्हणाले, ‘‘भरपूर पाऊस झाला म्हणून आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असे होणार नाही. चुकीची धोरणे आणि त्याची चुकीची अंमलबजावणी यामुळे वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. साहेबी संस्कृतीमुळे व्यवस्था शेतकऱ्यापासून लांब गेली. या साहेबी संस्कृतीनेच शेतकऱ्यांची आज अवस्था वाईट झाली आहे़ शेतकऱ्यांच्या समस्या तात्कालिक नाहीत. त्यामुळे त्याच्यावर केवळ मलमपट्टी करणारे तत्कालिक उपाय करुन चालणार नाहीत, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे. नामच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न करीत आहोत. हे काम करताना आम्ही साहेबी संस्कृती लांब ठेवली. आम्हाला आमच्या या कामाचे क्रेडिट नको, आम्ही इतरांसारखेच सर्वसामान्य आहोत, आम्हाला कोणीही देवदूत समजू नये.’’