मद्याचा काळाबाजार सुरूच
By Admin | Updated: February 23, 2017 03:30 IST2017-02-23T03:30:31+5:302017-02-23T03:30:31+5:30
निवडणुकीच्या काळात सलग बंद ठेवल्या गेलेल्या वाईन शॉप, बिअर बार आणि परमीट रूममुळे

मद्याचा काळाबाजार सुरूच
पुणे : निवडणुकीच्या काळात सलग बंद ठेवल्या गेलेल्या वाईन शॉप, बिअर बार आणि परमीट रूममुळे ड्राय डेच्या काळात मद्यपींना काळ्याबाजारातून मिळणाऱ्या मद्यावर विसंबून राहावे लागले. पुणे जिल्ह्यात निवडणुकीपूर्वी पोलिसांनी व उत्पादन शुल्क विभागाने ९३ ठिकाणी छापे घातले होते, ते नंतर छुपेपणे सुरूच असल्याचे सांगण्यात येते. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २०, २१ आणि २३ या दिवशी वाईन शॉप, बिअर बार आणि परमीट रूम, देशी दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अनेक मद्यप्रेमींनी १९ तारखेलाच साठा करून ठेवला. गावठी दारूचे धंदे बंद केल्याचे सांगितले जात असले तरी छुपेपणे सारे काही सुरूच असल्याचे दिसून येते. काही वाईन शॉप्सच्या आजुबाजुला असलेल्या अन्य दुकानांमधून काळाबाजार होत असल्याचे माहितगारांनी सांगितले. दरम्यान, विषारी गावठी दारूमुळे मृत्यू होण्यासारखी घटना झाल्यानंतर गावठी दारूच्या धंद्यांवर छापे घातले जातात. त्यानंतर उत्पादन शुल्क अधिकारी किंवा पोलीस असे धंदे सुरू नसल्याचा निर्वाळा देतात; मात्र ९३ ठिकाणी छापे घालून १,३५६ लिटर दारू जप्त केल्याचे आणि १९ खटले दाखल केल्याचे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते. (प्रतिनिधी)