सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार
By Admin | Updated: May 27, 2015 01:05 IST2015-05-27T01:05:01+5:302015-05-27T01:05:01+5:30
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही.

सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार
पुणे : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेची त्यांच्यावर नाराजी असली तरी हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. त्यामुळे हे सुटाबुटातील सरकार ‘सेल्फी सरकार’ असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी केली.
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी पुण्यात काँग्रेस भवन येथे ‘अच्छे दिनची पुण्यतिथी’ साजरी करण्यात आली. तसेच या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ओझा यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला.
या वेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी आदी उपस्थित होते.
भाजपने वर्षभरापूर्वी दिलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका करीत ओझा म्हणाल्या, ‘‘भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेप्रमाणे लोकांचा विकास झाला नाही. केवळ अदानीसारख्या काही लोकांचाच विकास झाला. देशाचा विकास दर वाढला नाही.
सुशासन, रोजगारीचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्यांचे
प्रमाण वाढले तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत.
त्यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन फोल ठरले आहे.’’ (प्रतिनिधी)
मेक इन इंडिया फक्त स्वप्नच उरले आहे. इंधनाचे दर कमी न झाल्याने महागाई वाढलेलीच आहे. माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. तरीही हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे.
जनतेशी संपर्क नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मोदी यांच्या रुपाने पक्षाला एक चांगला ‘इव्हेंट मॅनेजर’ मिळाला आहे. त्यांनी वर्षभर हेच काम केले. काँग्रेसच्या सरकारने मागील १० वर्षांत सर्वाधिक विकास केला.
मात्र, सुटाबुटातील या सरकारला हा विकास टिकविणेही शक्य होत नाही. आर्थिक दूरदृष्टी नसलेले हे दिशाहीन सरकार आहे. त्यामुळे मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने भाषणे कमी देवून काम अधिक करावे, असे ओझा म्हणाल्या.