भाजपाची पहिली यादी आज ?
By Admin | Updated: February 1, 2017 05:07 IST2017-02-01T05:07:18+5:302017-02-01T05:07:18+5:30
महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपाच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहर पदाधिकाऱ्यांची बैठक
भाजपाची पहिली यादी आज ?
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपाच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही प्रभागांमधील जागांबाबत निर्माण झालेला तिढा अखेर मुख्यमंत्र्यांकडून सोडविला जाणार असून बुधवारी भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले व इतर प्रमुख पदाधिकारी सोमवारी रात्री मुंबईत पोहोचले. त्यानंतर पुण्यातील जागांचा तिढा सोडविण्यासाठी त्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक राहिले असताना अजून पहिली उमेदवारी यादीही जाहीर न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असलेल्या इच्छुकांकडून शिवसेना व मनसेच्या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे.
भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी एक हजार इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यानंतर १६२ जागांवरील उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी २५ जानेवारीपासून भाजपा कार्ड कमिटी सदस्यांच्या बैठका सुरू आहेत. अनेक प्रभागांमधील जागांबाबत कार्ड कमिटीच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आमदारांच्या बैठका घेऊन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.
कार्ड कमिटीकडून ९० सदस्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र त्यातील अनेक नावांवर एकमत झाले नव्हते, त्याचबरोबर काही विद्यमान नगरसेवकांचे नाव यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर तुमचे उमेदवारांच्या नावांवर एकमत करा; अन्यथा आम्ही निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पुन्हा कार्ड कमिटीच्या बैठका घेऊन उमेदवारांच्या नावांचा फेरविचार करण्यात आला. त्यानंतर सुधारित यादी घेऊन पालकमंत्री गिरीश बापट व शहराध्यक्ष योगेश गोगावले सोमवारी रात्री मुंबईत पोहोचले आहेत.
मनसेचीही यादी आज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.