बारा मतदारसंघांत भाजपा
By Admin | Updated: October 19, 2014 23:40 IST2014-10-19T23:40:28+5:302014-10-19T23:40:28+5:30
मावळमध्ये संजय ऊर्फ बाळा भेगडे, शिरूरमधील बाबूराव पाचर्णे या ग्रामीण भागातील २ तसेच दौंडमधील मित्र पक्ष रा.स.प.चे उमेदवार राहुल कुल यांची अशा ३ जागांवर वर्चस्व निर्माण केले.

बारा मतदारसंघांत भाजपा
पुणे : भारतीय जनता पक्षाने २१पैकी पुणे शहरातील ८ आणि चिंंचवड, शिरूर, मावळ या अन्य ३ तसेच मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने दौंडमध्ये जिंंकलेली जागा अशा १२ जागांवर विरोधकांचा नि:पात करून घवघवीत यश संपादन केले आणि जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तथापि ग्रामीण भागातील ३ मतदारसंघ वगळता इंदापूर, खेड आळंदी, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणी तिसऱ्या तर भोसरी, भोर व पुरंदर या मतदारसंघात भाजप चौथ्या क्रमांकावर आहे.
मावळमध्ये संजय ऊर्फ बाळा भेगडे, शिरूरमधील बाबूराव पाचर्णे या ग्रामीण भागातील २ तसेच दौंडमधील मित्र पक्ष रा.स.प.चे उमेदवार राहुल कुल यांची अशा ३ जागांवर वर्चस्व निर्माण केले. प्रारंभी केवळ मावळपुरता मर्यादित असलेला भाजप १० वर्षांपूर्वी शिरूर मतदारसंघात यशस्वी झाला. आता पुन्हा शिरूर-हवेली मतदारसंघ या पक्षाच्या ताब्यात आला असून दौंडमध्ये या पक्षाच्या मित्रपक्षाने मुसंडी मारल्याने या पक्षाची ग्रामीण भागात ३ पॉकेट्स निर्माण झाली आहेत.
शहरात भाजपने नेत्रदीपक यश संपादन केले असले तरी ग्रामीण भागातील ३ मतदारसंघ वगळता इंदापूर, खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणी तिसऱ्या तर भोसरी, भोर-वेल्हा मुळशी व पुरंदर या मतदारसंघात भाजप चौथ्या क्रमांकावर आहे.
खडकवासला या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दुहीमुळे पोटनिवडणुकीत यशस्वी झालेल्या भाजपला यंदा पाय रोवण्याची संधी मिळाली.
या मतदारसंघातील भाजपचे अस्तित्व तसे तुरळक असताना वर्चस्व निर्माण करून या पक्षाने राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. चिंंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देऊन भाजपने हाही मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)