‘शास्ती’वरून भाजपा-शिवसेनेत जुंपली
By Admin | Updated: February 11, 2017 02:26 IST2017-02-11T02:26:31+5:302017-02-11T02:26:31+5:30
महापालिकेची आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर राज्य सरकारने शास्तीकरात सवलतीचा शासनादेश काढला. मात्र, वेबसाईटवर आदेश दिसत

‘शास्ती’वरून भाजपा-शिवसेनेत जुंपली
पिंपरी : महापालिकेची आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर राज्य सरकारने शास्तीकरात सवलतीचा शासनादेश काढला. मात्र, वेबसाईटवर आदेश दिसत नसल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. शासनादेश काढल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर खोटे सांगून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात अनिधकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर अनधिकृत बांधकामे १०० दिवसांत नियमित करू, असे आश्वासन मुख्यमंत्री व स्थानिक नेत्यांनी दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.
शहरात सुमारे चार लाख बांधकामांपैकी पन्नास टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. महापालिकेने प्रशासनाने या बांधकामांना लावलेल्या दुप्पट शास्तीने नागरिक धास्तावले आहेत.ही शास्ती महापालिका निवडणुकीपूर्वी रद्द करू, असे आश्वासन भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले होते. मात्र, आचारसंहिता जारी झाली, तरी आदेश आला नाही, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. एवढेच नव्हे तर सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांकडूनही केली जात आहे. तर भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत हा जीआर दाखविला.
श्रेयवादाचे राजकारण
एकीकडे राज्य शासनात एकत्र असताना पिंपरी-चिंचवडमध्ये या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शास्तीचा जीआर खरा की खोटा यावरून जुंपली आहे. श्रेयवादाचे नवे राजकारण अनुभवयास मिळत आहे. नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (प्रतिनिधी)