भाजपाची रिपाइंबरोबरची युती कायम
By Admin | Updated: February 15, 2017 02:35 IST2017-02-15T02:35:26+5:302017-02-15T02:35:26+5:30
भाजपाकडून रेश्मा भोसले, सत्यभामा साठे, छाया वारभूवन या तीन अपक्ष उमेदवारांना पक्षाकडून मंगळवारी पुरस्कृत करण्यात आले.

भाजपाची रिपाइंबरोबरची युती कायम
पुणे : भाजपाकडून रेश्मा भोसले, सत्यभामा साठे, छाया वारभूवन या तीन अपक्ष उमेदवारांना पक्षाकडून मंगळवारी पुरस्कृत करण्यात आले. त्यापैकी प्रभाग २९ मध्ये कमळ चिन्हावर पक्षाच्या सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी मिळाली असतानाही त्यांच्याऐवजी रिपाइंच्या सत्यभामा साठे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
प्रभाग ७ ड मधून रेश्मा अनिल भोसले, प्रभाग २९ अ मधून सत्यभामा साठे, प्रभाग २६ अ मधून विजय वारभूवन यांना पक्षाकडून पुरस्कृत करण्यात आल्याचे गिरीश बापट
यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मंगेश गोळे, नितीन
कांबळे, सागर राठोड, असिफ मोमीन, कृष्णा सातभाई, जावेद खान, शरद शिंदे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी रेश्मा भोसले यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्जात पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस तर एबी फॉर्म भाजपाचा अशी विसंगती आढळून आल्याने त्यांना अपक्ष उमेदवार ठरविण्यात आले आहे. हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतरही त्यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग क्रमांक २९ अ मध्ये भाजपाकडून सरस्वती शेंडगे या भाजपाच्या अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. मात्र त्यांच्याऐवजी रिपाइंच्या अपक्ष उमेदवार सत्यभामा साठे यांना पक्षाकडून पुरस्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेंडगे यांच्याकडे अधिकृत कमळ चिन्ह असतानाही त्यांच्याऐवजी सत्यभामा साठे यांच्या करवत चिन्हाचा प्रचार भाजपा करणार आहे.
गिरीश बापट यांनी सांगितले, ‘‘प्रभाग २९ अ मध्ये सरस्वती शेंडगे यांना पक्षाकडून डमी अर्ज भरायला सांगितला होता, त्यानंतर पक्षाने सत्यभामा साठे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली होती. मात्र त्यापूर्वी शेंडगे यांनी एबी फॉर्म जमा केला असल्याने त्यांची भाजपाची उमेदवारी कायम राहिली. त्यानंतर त्यांनी माघार घेतली नसल्याने त्यांच्याऐवजी सत्यभामा साठे यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.’’
(प्रतिनिधी)