‘दांडी’बहाद्दर नगरसेवकांना भाजपाकडून नोटिसा -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:36+5:302021-02-20T04:31:36+5:30
पुणे : ॲानलाइन पद्धतीने घेतलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या २७ नगरसेवकांना भाजपकडून नोटीस बजावली आहे. हे सर्व नगरसेवक ...

‘दांडी’बहाद्दर नगरसेवकांना भाजपाकडून नोटिसा -
पुणे : ॲानलाइन पद्धतीने घेतलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या २७ नगरसेवकांना भाजपकडून नोटीस बजावली आहे. हे सर्व नगरसेवक भाजपचेच असून, गैरहजर राहण्यामागील कारणांचा खुलासा करावा, असे नोटिशीमध्ये नमूद आहे.
महापालिकेची खास सभा तसेच पर्यावरणाची तहकूब सभा गुरुवारी (दि. १८) आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित राहावे, यासाठी नगरसचिव कार्यालयाच्या वतीने टपालाद्वारे कार्यपत्रिका पाठविली होती. तसेच सभागृह नेता कार्यालयामार्फत नगरसेवकाला फोन केले होते. परंतु, २७ सभासदांनी ‘दांडी’ मारली. वारंवार आठवण करूनही अनुपस्थित राहिलेल्या या सर्व सभासदांना नोटीस बजावित सभागृह नेते गणेश बिडकर यांनी खुलासा मागितला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांच्यासह सभागृह नेता कार्यालयाकडे खुलासा द्यावा, असे नोटिशीत आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अधिकाधिक विकासकामे होणे भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षांकडून महत्त्वाच्या विषयांना विरोध झाल्यास बहुमताच्या जोरावर विषय मान्य करावे लागतात. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सभासदाने हजर राहावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या प्रशिक्षणवर्गामध्ये देखील सभागृहात हजर राहून प्रश्न कसे उपस्थित करायचे, यावर मार्गदर्शन केले होते. तरीदेखील नगरसेवक गैरहजर राहत असल्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे.
====
‘दांडी’ बहाद्दरांमध्ये पदाधिकारीच अधिक
सभेला दांडी मारणाऱ्यांमध्ये पदाधिकारीच अधिक असून, विविध महत्त्वाच्या समित्यांवर सदस्य, अध्यक्ष तसेच स्थायी समितीमध्ये काम करणारे आजी, माजी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील सर्वात अधिक सभासदांनी या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली.
====
पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सभेला उपस्थित राहावे अशा सूचना होत्या. पालिका आयुक्तांनी मिळकतकरात सुचविलेली वाढ फेटाळून पुणेकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी खास सभा बोलाविली होती. पक्षाच्या शिस्तीचे पालन न केलेल्या २७ सभासदांना नोटीस देऊन खुलासा मागितला.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका