पोटनिवडणुकीमध्ये मनसेसह भाजपाने गमावली संधी

By Admin | Updated: January 20, 2015 00:45 IST2015-01-20T00:45:24+5:302015-01-20T00:45:24+5:30

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक आणि भाजपपुढे दोन्ही जागेवर विजयी होण्याचे आव्हान होते.

BJP has lost the opportunity in the by-election with MNS | पोटनिवडणुकीमध्ये मनसेसह भाजपाने गमावली संधी

पोटनिवडणुकीमध्ये मनसेसह भाजपाने गमावली संधी

पुणे : शहरातील दोन प्रभागांची पोटनिवडणूक विरोधी पक्षनेते पदासाठी निर्णायक ठरली. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक आणि भाजपपुढे दोन्ही जागेवर विजयी होण्याचे आव्हान होते. मात्र, दोन्ही जागांवर सत्ताधारी राष्ट्रवादीने बाजी मारल्यामुळे मनसे व भाजपने संधी गमावली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे कायम राहणार आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग क्रमांक २६ चे काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून कसबा मतदारसंघातून निवडणूक लढविली. तर, प्रभाग क्रमांक ४६ चे शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी पदाचा राजीनामा देऊन मनसेतून हडपसर विधानसभा निवडणूक लढविली होती. दोघांना त्यात अपयश आले होते़ रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. पूर्वी काँग्रेसमधून निवडणूक लढविलेल्या मानकर यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून अर्ज भरला होता, तर प्रमोद भानगिरे यांनी स्वत: उमेदवारी अर्ज न भरता, स्थानिक आघाडीच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाविषयी उत्सुकता होती.
शहरात लोकसभा, विधानसभा व पुणे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पोटनिवडणुकीतील दोन्ही जागा मिळवून विरोधी पक्षनेतेपद खेचून आणण्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता. त्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपचे कॅबिनेट व राज्यमंत्री उतरले होते.
प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादीचे मानकर यांच्याविरोधात भाजपने माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांना उमेदवारी दिली होती. तर, प्रभाग क्रमांक ४६ मधील पोटनिवडणूक भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिरवकर व विधानसभेचे उमेदवार प्रमोद भानगिरे यांनी चुरशीची केली होती. (प्रतिनिधी)

निर्णायक निकाल...
महापालिकेत विरोधी पक्षनेते पद असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ २९ होते, तर मनसेचे २८ आणि भाजपचे २६ असे संख्याबळ होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी मानकर यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होऊन २८ आणि भानगिरे यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेचे १५ वरून १४ इतके संख्याबळ झाले होते. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडून खेचून आणण्यासाठी मनसेला एका जागेची आणि भाजपला दोन जागांची आवश्यकता होती. मात्र, दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारल्यामुळे मनसे व भाजपची संधी हुकली असून, विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे राहणार असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले.

 

Web Title: BJP has lost the opportunity in the by-election with MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.