महापालिकेसाठी पाचशे कोटींची भाजपाची राज्य सरकारकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:45+5:302021-04-01T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीत संपूर्ण वर्षभर पुणे महापालिकेने चांगले काम केले आहे़ परंतु, हे काम करीत ...

महापालिकेसाठी पाचशे कोटींची भाजपाची राज्य सरकारकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीत संपूर्ण वर्षभर पुणे महापालिकेने चांगले काम केले आहे़ परंतु, हे काम करीत असताना राज्य सरकारने पुणे महापालिकेला काहीही मदत न करता पुण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. पुणे महापालिकेला राज्य सरकारने पाचशे कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ३१) शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर आदी या वेळी उपस्थित होते़
मुळीक म्हणाले की, महापालिका चांगले काम करीत आहे परंतु राज्य सरकारची भूमिका दुर्दैवी आहे. जम्बो कोविड सेंटरही महापालिका करीत आहे. साथीच्या आजाराची जबाबदारी ही राज्य सरकारची असली तरी, महापालिका म्हणून आम्ही ती टाळत नाही. परंतु राज्य सरकार काहीच मदत करत नाही. महापालिकेची आर्थिक घडी आता कुठे पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची मदत करावी. मात्र राज्य सरकारची मानसिकता लॉकडाउन करण्याची आहे. भारतीय जनता पार्टीचा लॉकडाउनला पूर्ण विरोध असून, आम्ही वेळ आल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू असेही ते म्हणाले़
चौकट
लॉकडाऊन परवडणारा नाही
“आत्ता पुन्हा लॉकडाऊन केला तर तो कोणालाच परवडणारा नाही. त्यामुळे आम्ही महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. शहरातील कोरोना चाचण्या वाढविणे, लसीकरणाचा वेग वाढविणे यासाठी सूचना केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या बदलत्या स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये. साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहे.” -गिरीश बापट, खासदार