भाजपाने जनतेची फसवणूक केली : शिवतारे
By Admin | Updated: February 14, 2017 01:36 IST2017-02-14T01:36:12+5:302017-02-14T01:36:12+5:30
‘केंदूर-पाबळकरांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटवणार आहे, राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांनी जनतेची फसवणूक केली.

भाजपाने जनतेची फसवणूक केली : शिवतारे
कोरेगाव भीमा : ‘‘केंदूर-पाबळकरांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटवणार आहे, राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांनी जनतेची फसवणूक केली. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका ,’’ असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
पाबळ (ता. शिरूर) येथे शिवसेनेच्या केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जयश्री पलांडे, पाबळ गणाचे उमेदवार सोपान जाधव, केंदूर गणाच्या उमेदवार शीतल दरेकर या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत विजय शिवतारे बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राम गावडे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, सरपंच मनीषा बगाटे, उपसरपंच सारिका पानसरे व ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव, रवी चौधरी, सुखदेव थोरवे, देवा उमाप उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, ‘‘भाजपा सरकारने फक्त थापा मारल्या आहेत. थेऊर कारखाना १०० दिवसांत सुरू करून भ्रष्ट संचालकांना तुरुंगात टाकू असे म्हणणाऱ्यांनी त्याच संचालकांना हार घालून पक्षात आणले. हेच का यांचे अच्छे दिन? त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.’’
जयश्री पलांडे म्हणाल्या, ‘‘केंदूर-पाबळकरांच्या पाण्याचा प्रश्न जलसंपदामंत्र्याच्या माध्यमातून सोडवितानाच प्रत्येक गावात शुद्ध पाणी प्रकल्प देण्यावर भर देणार आहोत.’’ (वार्ताहर)