राज्यात सातपैकी सहा कॅन्टोन्मेंटवर भाजप-सेना
By Admin | Updated: January 15, 2015 00:06 IST2015-01-15T00:06:56+5:302015-01-15T00:06:56+5:30
देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत भाजपाने प्रतिष्ठेच्या जागा गमावल्या असल्या, तरी बहुतांश बोर्डांमध्ये ठिकाणी भाजपची सत्ता आली,

राज्यात सातपैकी सहा कॅन्टोन्मेंटवर भाजप-सेना
सर्वजित बागनाईक, खडकी
देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत भाजपाने प्रतिष्ठेच्या जागा गमावल्या असल्या, तरी बहुतांश बोर्डांमध्ये ठिकाणी भाजपची सत्ता आली, तर राज्यातील ७ पैकी ६ ठिकाणी भाजप-सेना सत्तेत आली. खडकीत मोदी लाटेचा प्रभाव झाला नाही, काँगे्रसने गड राखला.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपाठोपाठ बोर्डाची निवडणूक झाली. महाराष्ट्रातील भिंगार (अहमदनगर), औरंगाबाद, देवळाली (नाशिक), कामठी (नागपूर), देहूरोड, पुणे व खडकी या ठिकाणी भाजप-सेनेने वर्चस्व राखले. तर खडकीत मात्र, काँग्रेसने बाजी मारली. कामठी, देहूरोड, पुणे, देवळाली या ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले. निवडणूकीमध्ये बहुतांश ठिकाणी भाजप-सेनेची युती नव्हती. दोघांनीही स्वतंत्र जागा लढविल्या. औरंगाबादमध्ये भाजप-सेना युती झाल्यास ७ पैकी ४ व नगरमध्येसुद्धा ७ पैकी ४ जागांमुळे बहुमत मिळू शकते. राज्यातील केवळ खडकीत काँगे्रसची सत्ता कायम राहिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी फारशे यश मिळाले नाही. तर मनसे निवडणूक रिंगणातच उतरली नव्हती. शिवसेनेलाही हवा तेवढा फायदा घेता आला नाही. पुणे परिसरातील तीनपैकी एकही जागा सेनेला मिळाली नाही. तर पुण्यातील ८ पैकी ५ जागांवर व खडकीतील १ जागेवर भाजपाने विजय मिळविला. तर अहमदनगरच्या भिंगार बोर्डात भाजपला १, सेनेला ३, राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या. तसेच औरंगाबाद बोर्डात ७ पैकी २ सेना, २ भाजप व ३ अपक्ष निवडूण आले. दोन्ही ठिकाणी काँगे्रसला एकही जागा मिळविता आली नाही. नाशिक येथील देवळाली कॅन्टोन्मेंटमध्ये ८ पैकी ६ जागा घेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. तर सेना व अपक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली. नागपूर येथील कामठी बोर्डात भाजपने ४, अपक्ष २, काँगे्रसने १ जागा मिळवली. येथेही भाजप समर्थक उमेदवार स्वबळावर सत्ता स्थापन करतील. देहूरोड ७ पैकी ४, पुणे ८ पैकी ५ जागा मिळवित भाजपने स्वबळावर झेंडा रोवला.