घोडेगावच्या शेतकऱ्यांना चुकीची व भरमसाट बिले
By Admin | Updated: October 3, 2015 01:33 IST2015-10-03T01:33:43+5:302015-10-03T01:33:43+5:30
वीज वितरणच्या घोडेगाव येथील कार्यालयामधील अनियमित कारभार तसेच चुकीची व भरमसाट बिलांच्या निषेधार्थ घोडेगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी महावितरण

घोडेगावच्या शेतकऱ्यांना चुकीची व भरमसाट बिले
घोडेगाव : वीज वितरणच्या घोडेगाव येथील कार्यालयामधील अनियमित कारभार तसेच चुकीची व भरमसाट बिलांच्या निषेधार्थ घोडेगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता.
या कार्यालयातील अधिकारी जोपर्यंत रीडिंग व फोटोप्रमाणे लाईट बिले देत नाही. तोपर्यंत एकही शेतकरी वीज बिल भरणार नसल्याचा इशारा पंचायत समिती सदस्य कैलासबुवा काळे यांनी दिला.
घोडेगाव उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना शेतीपंपाची व घरगुती लाईट बिले भरमसाट येत आहेत. चुकीचे रीडिंग व फोटो न घेता अधिकारी अंदाजे लाईट बिले आकारतात.
शेतकऱ्यांना बिल दुरुस्तीसाठी हेलपाटे मारवे लागतात.
या कार्यालयामधून ग्राहकांची छळवणूक केली जाते. याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २) कैलासबुवा काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सरपंच देविदास दरेकर, उपसरपंच तुकाराम काळे, बाजार समितीचे संचालक सखाराम पाटील काळे, विघ्नहर कारखान्याचे संचालक यशराज काळे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काळे, देवराम बेल्हवरे, सुरेश काळे, विजय काळे, दशरथ काळे, मुकुंद काळे उपस्थित होते.
या वेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दि.१० आक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा कैलासबुवा काळे यांनी दिला. (वार्ताहर)