महामार्गावरून सायकलने आणावे लागते पाणी
By Admin | Updated: May 22, 2014 05:50 IST2014-05-22T05:50:19+5:302014-05-22T05:50:19+5:30
थील वलखेड वस्तीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून धोका पत्करून पाण्याची वाहतूक सायकलद्वारे नागरिकांना करावी लागत आहे.

महामार्गावरून सायकलने आणावे लागते पाणी
पेठ : येथील वलखेड वस्तीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून धोका पत्करून पाण्याची वाहतूक सायकलद्वारे नागरिकांना करावी लागत आहे. रोज सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान नागरिकांना अर्धा कि. मी. अंतरावरील निसर्गसान्निध्य केंद्रावरून पाण्याच्या कॅनद्वारे अत्यंत चढणीचा रस्ता पार करीत पिण्याचे पाणी न्यावे लागते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीतील पेठ-अवसरी घाटाच्या पूर्व बाजूला पोलीस वायरलेस केंद्राच्या पलीकडे वलखेड वस्ती आहे. या वस्तीला पावसाळा वगळता अन्य कालावधीत पिण्याच्या व वापराच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासते. पेठ ग्रामपंचायतीने येथे पाणीपुरवठा योजनेतून नळाद्वारे पाणी पुरविले आहे. मात्र वलखेड वस्ती उंचावर असल्याने व तांत्रिक अडथळ्याने पिण्याचे पाणी उन्हाळ्यात कमी दाबाने मिळते. जनावरांसाठी व इतर वापराचे पाणी कमी मिळत असल्याने येथील लहान मुले, महिला व नागरिक सायकलला ३५ ते ४० लिटर क्षमतेची पाण्याची कॅन दोन्ही बाजूला अडकवतात. संपूर्ण चढाचा रस्ता असल्याने मोठी कसरत करत नागरिक निसर्गसान्निध्य केंद्रातून पाणी वाहून नेत आहेत. या वस्तीवर शासनाने पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख दिलीप पवळे यांनी केली आहे.