कारेगाव-रांजणगाव गणपती गटात मोठी चुरस

By Admin | Updated: January 31, 2017 03:56 IST2017-01-31T03:56:54+5:302017-01-31T03:56:54+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भोसरी, चाकणनंतरचा पंचतारांकित औद्योगिक पट्टा म्हणजे शिरूर तालुक्यातील

Big picks in the Karegaon-Ranjangaon Ganpati group | कारेगाव-रांजणगाव गणपती गटात मोठी चुरस

कारेगाव-रांजणगाव गणपती गटात मोठी चुरस

रांजणगाव गणपती : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भोसरी, चाकणनंतरचा पंचतारांकित औद्योगिक पट्टा म्हणजे शिरूर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, मोठी चुरस निर्माण झाली आहे.
औद्योगिक पट्ट्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या गटाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुळातच हा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने दिग्गज मंडळींचे मनसुबे संपुष्टात आले आहेत. आपापल्या सोयीने महिलांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली. या गटात गेल्या निवडणुकीत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे यांनी कडवी लढत देऊन विजय संपादन केला होता. आता गतवेळच्या गटरचनेत बदल होऊन गावांची अदलाबदल झाली आहे. सुमारे ३० हजारांच्यादरम्यान मतदार आहे. आरक्षणही सर्वसाधारण महिलांसाठी झाल्याने राहुल पाचर्णे यांनी न्हावरा गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु आता शिरूर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण आल्याने राजकीय समीकरणात मोठा फेरबदल होईल, यात शंका नाही. त्यामुळे पंचायत समिती गणांच्या इच्छुकांमध्ये वाढ होणार आहे. कारेगाव-रांजणगाव गणपती गटासाठी राष्ट्रवादी क ाँग्रेस तसेच भाजपा या पक्षांच्या इच्छुक महिला उमेदवारांनी प्रचाराची धुरा गेल्या २ ते ३ महिन्यांपासूनच आपल्या खांद्यावर घेऊन उमेदवारी दाखल करण्याआधीच मतदारसंघात गावभेट दौरे करीत प्रचारात रंगत आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये रांजणगावच्या विद्यमान सरपंच स्वाती पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे यांच्या पत्नी सखुबाई शिंदे, पंचायत समितीच्या सदस्या दीपाली शेळके, कारेगावच्या पुष्पलता नवले यांचा समावेश आहे, तर पंचायत समितीच्या सदस्या मनीषा पांचगे या भाजपाकडून दावेदार समजल्या जातात. कोंढापुरीच्या ज्योती गायकवाड यांचेही भाजपातर्फे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून पुष्पलता ओस्तवालांच्या नावाची चर्चा आहे. स्वाती पाचुंदकर व मनीषा पाचंगे यांनी गावभेट दौरे करून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. औद्योगिक पट्ट्यातील हा जिल्हा परिषद गट असल्याने सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचा केल्याने निवडणुकीत प्रचाराची राळ उठविली जाणार, यात शंका नाही. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (वार्ताहर)

कारेगाव गण सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित
गटातील कारेगाव गणात सुमारे १५ हजार पाचशेच्यादरम्यान मतदार असून सर्वसाधारण जागेसाठी हा गण आरक्षित आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने कारेगावचे सरपंच अनिल नवले, माजी उपसरपंच विश्वास कोहकडे, कान्हूरमेसाईचे सुधीर पुंडे, बंडू पुंडे, ढोकसांगवीचे सरपंच मल्हारी मलगुंडे, सुहास मलगुंडे, सोनेसांगवीचे दत्तात्रय कदम, वाघाळ्याचे सरपंच पप्पू भोसले, दीपक तळोले, उत्तम व्यवहारे यांनी उमेदवारी मिळावी, म्हणून सूत्रे हलविली आहेत. भाजपाच्यावतीने उमेदवारी मिळविण्यासाठी गणेश ताठे, दादासाहेब खर्डे, रामदास धुमाळ, गणेश धुमाळ प्रयत्नशील आहेत.

रांजणगाव गणात इच्छुकांची मांदियाळी
रांजणगाव गणपती गणात सुमारे १४ हजार पाचशेच्यादरम्यान मतदार आहे. येथेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची मांदियाळी असून कोंढापुरीचे उपसरपंच आशिष गायकवाड, खंडाळ्याचे सरपंच राजेंद्र नरवडे, गणेगावचे राजेंद्र धुमाळ, सुनील तांबे, बाळासाहेब टेमगिरे, रमेश धुमाळ, सुहास बांगर, रांजणगावचे श्रीकांत पाचुंदकर, गणेश लांडे, सर्जेराव खेडकर, बबनराव कुटे, पिंप्री दुमालाचे माजी सरपंच दिलीप खळदकर, बाभुळसरचे सरपंच दशरथ फंड आदींचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. भाजपातर्फे रांजणगावचे ग्रा. पं. सदस्य विक्रम पाचुंदकर, कोंढापुरीचे माजी सरपंच अशोक गायकवाड, रणजित फंड उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार?
खऱ्या अर्थाने हा गट दिलीप वळसे-पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या आंबेगाव मतदारसंघात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर यांनी कारेगाव रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येण्यासाठी कंबर कसली आहे, तर उद्योजक सतीश पांचगे हेही आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली गट भाजपाकडे राहण्यासाठी व्यूहरचना आखण्यात मग्न आहेत. शिरूर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण झाल्याने या गटातील गणाच्या मतदारसंघाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे तालुक्यातील उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी राजकीय समीकरणे बदलणार आहे.

Web Title: Big picks in the Karegaon-Ranjangaon Ganpati group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.