डिंभे कालव्याला मोठी गळती
By Admin | Updated: February 14, 2015 00:09 IST2015-02-14T00:09:04+5:302015-02-14T00:09:04+5:30
काही ठिकाणी ऐन उन्हाळयाच्या दिवसांत धबधबे वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जमिनीत दलदल निर्माण झाली आहे.

डिंभे कालव्याला मोठी गळती
डिंंभे : डिंभे धरणाच्या कालव्यातील गळतीमुळे दररोज हजारो-लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदिवासी भाग पाण्यासाठी वणवण करीत असताना धरणाच्या खालच्या भागात डोंगरांना पाझर फुटले आहेत. धबधबे वाहू लागले असून, सततच्या दलदलीमुळे जमिनीही नापीक झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. ही गळती कधी थांबणार, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
धरणातून सध्या दुसरे आवर्तन सुरू आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दररोज ७५० क्युसेक्सच्या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. डावा व उजवा कालवा हे या धरणाच्या दोन जलवाहिन्या आहेत.
दर वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये या कालव्यांतून हजारो लिटर पाणी वाया जाते. धरणापासून निघालेल्या मुख्य कालव्याचे पुढे दोन भागांत रूपांतर होत असून, गावच्या पुढे जंपिंग कालवा तयार करण्यात आला आहे. सुमारे दोन कि.मी. निर्माण झालेल्या या कालव्यातून अनेक ठिकाणी गळती होत आहे. ही गळती कायम राहिल्यास भविष्यात या कालव्यास धोका निर्माण होऊ शकतो.
कॅनॉलपासून निघालेला उजवा कालवाही अनेक ठिकाणी गळत असल्याने धरणाच्या खालच्या भागात डोंगरांना पाझर फुटले आहेत. काही ठिकाणी ऐन उन्हाळयाच्या दिवसांत धबधबे वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जमिनीत दलदल निर्माण झाली आहे. उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
(वार्ताहर)