इयत्ता ओलांडल्यानंतर मिळतात सायकली
By Admin | Updated: April 20, 2016 00:43 IST2016-04-20T00:43:45+5:302016-04-20T00:43:45+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकलवाटप केले जाते.

इयत्ता ओलांडल्यानंतर मिळतात सायकली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकलवाटप केले जाते. मात्र, सायकलवाटपास विलंब झाल्याने २०१३मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तब्बल २०१६मध्ये सायकलींचा ताबा मिळाला. त्यामुळे आठवीत अर्ज केलेले विद्यार्थी दहावीच्या वर्गात गेले, तर दहावीमध्ये असताना अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बारावीत गेल्यानंतर सायकल मिळाली.
महापालिकेकडून विविध योजनेंतर्गत विविध वस्तूंचे वाटप केले जाते. त्याच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेमुळे या वस्तू वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्या वस्तूंचा लाभार्थ्यांना फायदाही होत नाही.
मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात मोफत सायकलींचे वाटप केले जाणार होते. यासाठी अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी १ हजार ४१० विद्यार्थी पात्र ठरले. मात्र, विद्यार्थ्यांना त्या वर्षी सायकलवाटप झाले नाही. विविध कारणांनी वाटप रखडले. अखेर २०१६च्या मार्च महिन्यात वाटपास मुहूर्त लागला आहे. २०१३मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आता वाटप केले जात असले, तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा खरंच फायदा होईल का, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.
निगडी, त्रिवेणीनगर येथे राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने २०१३मध्ये अर्ज केला. त्यानंतर वारंवार पाठपुरावादेखील केला. मात्र, तिला विविध कारणे सांगितली जात होती. अखेर तब्बल तीन वर्षांनी या विद्यार्थिनीला सायकल मिळाली.
(प्रतिनिधी)
२०१२-१३ या वर्षात अर्ज मागविण्यात आले. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास योजना सुरू झाली. त्यामुळे बसपाससाठी आलेले अर्ज आणि सायकलसाठी आलेले अर्ज यांची तपासणी करण्यात आली. बसपाससाठी आलेले अर्ज वगळून यादी तयार करण्यात आली. यामध्ये वेळ गेला. तसेच योजनांमध्ये दुरुस्त्याही करण्यात आल्या. त्यामुळे सायकलवाटपास थोडा विलंब लागला.
संभाजी ऐवले,
समाजविकास अधिकारी