भोरला ३५० उमेदवारी अर्जांची विक्री

By Admin | Updated: July 13, 2015 23:45 IST2015-07-13T23:45:08+5:302015-07-13T23:45:08+5:30

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तर, ८ अर्ज आॅनलाईन भरण्यात आले.

Bhola's 350 applications for the candidature | भोरला ३५० उमेदवारी अर्जांची विक्री

भोरला ३५० उमेदवारी अर्जांची विक्री

भोर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तर, ८ अर्ज आॅनलाईन भरण्यात आले. मात्र, एकच अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली.
भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ५०० जागा, तर ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीतील ८८ रिक्त जागा अशा एकूण ११८ ग्रामपंचायतींच्या ५८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. २० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरल्यावर तो निवडणुक अधिकाऱ्यांना दाखवायचा आहे. त्या अर्जासोबत उमेदवाराला विविध प्रकारची घोषणापत्रे, प्रतिज्ञापत्र व दाखले जोडावे लागणार आहेत. हे दाखले न जोडल्यास उमेदवारी अर्ज बाद होणार असल्याने ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी अनेक गावांच्या इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. यामुळे भोर शहरातील टायपिंग व झेरॉक्सच्या दुकानात तसेच सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ७ सदस्यांचे ४६२; तर वेळू, नसरापूर व उत्रौली ग्रामपंचायतींचे प्रत्येकी ९ सदस्य याप्रमाणे २७ तर भोलावडे ग्रामपंचायतीचे ११ सदस्य असे एकूण ५०० जागा व पोटनिवडणूक होणाऱ्या ८८ जागा अशा एकूण ५८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
शिक्षक भवन येथे निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज देण्यासाठी विक्री कक्ष व मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच, चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी केवळ एकाच उमेदवाराने आॅनलाईन अर्ज भरून दिला. अर्ज भरण्याबाबत कोणाला अडचणी असल्यास त्याची महिती दिली जाईल, असे तहसीलदार वर्षा शिंगणे-पाटील व नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Bhola's 350 applications for the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.