भोरला काँग्रेसचे वर्चस्व

By Admin | Updated: September 13, 2015 01:35 IST2015-09-13T01:35:52+5:302015-09-13T01:35:52+5:30

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

Bhola Congress domination | भोरला काँग्रेसचे वर्चस्व

भोरला काँग्रेसचे वर्चस्व

पुणे : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
बिनविरोध झालेल्या ४ जागाही काँग्रेस पक्षाच्या असल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याने, पुन्हा एकदा बाजार समितीत काँग्रेसने एकहाती सत्ता कायम राखली आहे.
विरोधी राष्ट्रवादीच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचा माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०१५ ते २०२०च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध गटांतील १९ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या सर्व जागा काँग्रेसच्याच होत्या, तर १५ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यांत काँॅग्रेस व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी १५ तर शिवसेनेचे २, भाजपाचा एक आणि दोन जागांवर अपक्ष उभे होते.
आज सकाळी ९ वाजल्यापासून खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये निवडणूक अधिकारी प्रवीण परब यांनी ग्रामपंचायत व कृषी पतसंस्था मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी सुरू केली. प्रथम खानापूर, संगमनेर, भोर, आंबेघर या मतदान केंद्रांपैकी भोर वगळता इतर तिन्ही केंद्रांवर सुरवातीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि नंतर शिवरे, किकवी, नसरापूर या केंद्रांवरही आघाडी कायम ठेवून सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविला.
कृषी पतसंस्था मतदारसंघात कमीत कमी ७३, तर जास्तीत जास्त १२९ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक ४७२ मते संदीप चक्के यांनी घेतली, तर ग्रामपंचायत मतदारसंघात सोमनाथ निगडे यांना सर्वाधिक ५५१ मते मिळाली आहेत.
सर्व ७ मतदान केंद्रांवर एकूण मतांपैकी कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघात १०१, महिला गटात ५५, इतर मागास गटात ४६, भटक्या विमुक्त गटात ४८ मते बाद झाली, तर सर्वसाधारण मतदारसंघात ५७, अनुसूचित जाती गटात ५०, आर्थिक दुर्बल गटात ४९ मते बाद झाली आहेत. एकूण मतांपैकी १० ते १५ टक्के मते बाद झाली, तर तेवढ्याच मतांचे क्रॉस वोटिंग झाले आहे.

मागच्या वेळी वाटाघाटी करून, ५ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या. सध्या दुष्काळसदृश परिस्थती असल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच आमची इच्छा होती. तरीही विरोधकांनी निवडणूक लादली. सर्वच जागा जिंकून आम्ही विरोधकांना खऱ्या अर्थाने धोबीपछाड दिला आहे.
- संग्राम थोपटे
(आमदार, राजगड कृषी
विकास पॅनलचे प्रमुख)

Web Title: Bhola Congress domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.