भीमाशंकरला वादळी फटका
By Admin | Updated: April 22, 2015 05:33 IST2015-04-22T05:33:28+5:302015-04-22T05:33:28+5:30
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मंगळवारी (दि. २०) वादळी व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दोन तास या भागात कहर माजविला.

भीमाशंकरला वादळी फटका
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मंगळवारी (दि. २०) वादळी व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दोन तास या भागात कहर माजविला. पावसाबरोबरच वादळासह पोखरी येथे जोरदार गारपीट झाली. पोखरी व गोहे परिसरात अनेक घरांची छपरे उडून गेली. विजेचे खांब व तारा तुटून नुकसान झाले. ढगेवाडी येथे विजेचा धक्का बसून तीन मुले जखमी झाली आहेत.
भीमाशंकर खोऱ्यातील गोहे, राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, फळोदे, तळेघर, तेरूंगण, राजपूर तसेच पाटण खोऱ्यातील आदिवासी गावांना या पावसाने झोडपून काढले आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी डिंभे धरणाच्या व गोहे पाझरतलावाच्या पाण्यावर उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. पावसाने या पिकाचे नुकसान झाले आहे. ऐन कणसे भरण्याच्या वेळेसच पीक भुईसपाट झाले. भातखाचरे पाण्याने भरल्याने सध्या जमीन भाजणीची कामे खोळंबली. पालापाचोळा, शेणखत व राब भिजल्याने वापसा नाहीसा झाला आहे. (वार्ताहर)