‘भीमा-पाटस’ला ६० टक्के मतदान
By Admin | Updated: May 21, 2015 23:05 IST2015-05-21T23:05:16+5:302015-05-21T23:05:16+5:30
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरुत्साही वातावरणात सरासरी ६० टक्के मतदान झाले

‘भीमा-पाटस’ला ६० टक्के मतदान
दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरुत्साही वातावरणात सरासरी ६० टक्के मतदान झाले असून खामगाव येथील प्रकार वगळता मतदान शांततेत झाले़ शनिवार (दि.२३) रोजी सकाळी सोनवडी (ता. दौंड) येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
भीमा पाटसची निवडणूक आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनल तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव सहकार पॅनल यांच्यात झाली. आमदार राहुल कुल यांनी राहू केंद्रावर तर माजी आमदार रमेश थोरात यांनी खुटबाव केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान निरुत्साही वातावरणात मतदान झाल्याने ठिकठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांचा अभाव दिसून येत होता. तर मतदान केंद्रेही ओस पडलेली होती. मतदारांपेक्षा अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचीच वर्दळ अनेक मतदान केंद्रावर अधिक होती. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. साधारणत: ९ वाजेपर्यंत तुरळक पद्धतीने मतदान झाले. परंतु ११ ते दुपारी ३ पर्यंत बऱ्यापैकी मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. वाढते उन्ह आणि मतदारांची उदासिनता हे दोन प्रमुख कारणे मतदान केंद्रावरील शुकशुकाटीची असल्याचे मतदान केंद्र परिसरात बोलले जात होते.
साधारणत: सायंकाळी चार नंतर मतदारांचा ओघ बऱ्यापैकी वाढल्याने मतांच्या टक्केवारीत वाढ होण्यास मदत झाली असल्याची वस्तुस्थिती आहे. मतदार केंद्राच्या परिसरात शांतता असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि पोलीसांना फक्त जांबळ््या देण्याचे काम उरले होते. कारण चार ते पाच मतदार आल्यानंतर १५ ते २0 मिनिट मतदार फिरकत नव्हता अशा मंदगतीने मतदान प्रक्रिया पार पडली.
दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी घरोघरी जाऊन विनवणी करीत होते. मात्र मतदारांनी सोयीनुसार मतदान केंद्रावर येण्याचे पसंत केले.
घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला?
मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा आमदार राहुल कुल यांच्या जनसेवा पॅनलला की विरोधी माजी आमदार रमेश थोरात यांच्या भीमा बचाव सहकार पॅनलला, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यामुळे आता शनिवारी (दि. २३) होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
४भीमा -पाटस सहकारी साखर
कारखाना निवडणुकीसाठी दौंड राजेगाव गटात पारवडी मतदान केंद्रावर ८० टक्के मतदान झाले. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी
प्रथमच बारामती तालुक्यातील पारवडी येथे मतदान केंद्र उभारण्यात आले होते. पारवडी ,शिर्सुफळ,सिध्देश्वर निंबोडी आदी गावांचा यामध्ये
समावेश आहे.